Abhishek Sharma Unwanted Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक शर्माची बॅट शांत राहिली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकावलं होतं. आता आयपीएल २०२६ स्पर्धेतही तो हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो पुन्हा एकदा शून्यावर माघारी परतला. यासह अभिषेक शर्माचा नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. अभिषेक शर्मा हा एकाच वर्षात सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याच्या रेकॉर्डमध्ये संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या विक्रमात त्याने संजू सॅमसन आणि रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
अभिषेक शर्माच्या नावे नकोसा रेकॉर्ड
अभिषेक शर्माला आयपीएल २०२६ स्पर्धेत अजूनही सूर गवसलेला नाही. २०२६ वर्षात टी -२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना तो ६ वेळा शून्यावर माघारी परतला आहे. भारताचा माजी फलंदाज रोहित शर्मादेखील २०१८ मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ६ वेळेस शून्यावर माघारी परतला होता. तर संजू सॅमसन देखील २०२४ मध्ये फलंदाजी करताना ६ वेळा शून्यावर बाद झाला होता. या वर्षात जर तो आणखी एकदा शून्यावर माघारी परतला. तर सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचेल.
एकाच वर्षात टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे फलंदाज
रोहित शर्मा – ६ वेळा (२०१८)
संजू सॅमसन – ६ वेळा (२०२४)
अभिषेक शर्मा -६ वेळा (२०२६)
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा फ्लॉप शो
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. टॉप ४ फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. ट्रॅव्हिस हेड अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. पण अभिषेक शर्माला खातंही उघडता आलं नाही. इशान किशन १, लियाम लिव्हिंगस्टन १४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने मिळून डाव सांभाळला. क्लासेनने ६२ धावा केल्या. तर नितीश रेड्डीने ५६ धावा केल्या. या खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर ९ गडी बा १५६ धावा केल्या.
