Big Blow to Team India: भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकपमधील पुढील सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. या खेळाडूला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरूवात भारताने विजयाने केली. तर भारताचा आता पुढील सामना नामिबियाविरूद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात बुमराहदेखील वायरल ताप येत असल्याने खेळू शकला नव्हता.
भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची तब्येत ठीक होत नसल्याने त्याला रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. अभिषेक शर्माला पोटात संसर्ग झाल्याचे निदान झालं आहे आणि नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याबाबत शंका आहे. तर दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर फिट झाला असून संघात परतला आहे.
७ फेब्रुवारीला झालेल्या मुंबई विरुद्ध अमेरिकेच्या सामन्यापूर्वी अभिषेक आजारी होता. मैदानात उतरल्यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावली. मुंबईत त्याला तापही आला आणि त्याला ड्रिपदेखील लावण्यात आली होती. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात, अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर तो फिल्डिंगदेखील उतरला नाही. सामन्यानंतर बोलतानाही सूर्यकुमारने त्याची तब्येत ठिक नसल्याचा खुलासा केला होता.
मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा भारतीय संघाच्या पहिल्या सराव सत्रात सहभागी झाला नाही. दरम्यान, भारतीय संघाने अभिषेकला पोटदुखीचा त्रास असल्याचे आणि त्याला वायरल झाल्याचं सांगितलं. माध्यमांशी बोलताना सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्काटे म्हणाले, “अभिषेकला पोटाचा त्रास आहे. आम्हाला आशा आहे की तो दोन दिवसांत सामन्यासाठी उपलब्ध होईल.”
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा मैदानात पुन्हा उतरला नाही, त्याच्या जागी संजू सॅमसन मैदानात आला. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहदेखील आजारी असल्याने आणि वॉशिंग्टन सुंदर संघात सामील झाला नसल्याने कुलदीप यादवसह क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी भारतीय खेळाडूंना मैदानावर पाणी नेऊन देण्याची जबाबदारी पार पाडली होती.
अभिषेक सरावच्या अनुपस्थितीदरम्यान संजू सॅमसन नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसला. त्यामुळे अभिषेक शर्मा वेळेत फिट न झाल्यास त्याच्या जागी संजू सॅमसन सलामीला उतरू शकतो. संजू सॅमसनने सराव सामन्यात जोरदार फलंदाजी सरावामुळे नामिबियाविरुद्ध खेळण्याची अभिषेकची शक्यता कमी आहे. गेल्या २४ तासांत त्याची प्रकृती आणखी खालावल्याचे वृत्त आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत गौतम गंभीरच्या डिनर पार्टीत अभिषेक टीम इंडियासोबत दिसला होता..

