इंदूर : वेस्ट इंडिज संघाने मला रोखण्यासाठी रणनीती आखली होती आणि या रणनीतीला चोख उत्तर देण्यात मी यशस्वी ठरलो, असे भारताचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा म्हणाला.तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या निसटत्या विजयात अभिषेकची ३० चेंडूंतील ६९ धावांची खेळी निर्णायक ठरली होती. त्याने इशान किशनच्या साथीत १०८ धावांची भागीदारी देखील केली.
‘‘माझ्या फलंदाजीचा अभ्यास करून वेस्ट इंडिजने रणनीती आखली होती. ऑफ स्पिनर रॉस्टन चेसकडून गोलंदाजी सुरुवात, ऑफ साईडला क्षेत्ररचना ठेवणे हा या रणनीतीचाच भाग होता. यामुळे मला मैदानावर धावांसाठी अन्य पर्याय शोधणे भाग पडले आणि हा मार्ग शोधण्यात मी यशस्वी ठरलो,’’ असे अभिषेक म्हणाला.
‘‘माझ्याविरुद्ध ऑफ-स्पिनर गोलंदाजी करत होता, त्यामुळे ती केवळ त्याच्यात आणि माझ्यातली लढत होती. मी त्याला पहिल्या षटकात आदर दिला कारण तो या मालिकेत खूप चांगली गोलंदाजी करत आहे. तसेच पॉवरप्लेमध्ये मी काही धावा काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी माझ्यासाठी रणनीती आखली होती आणि मला त्यापेक्षा सरस खेळायचे होते. मी विचार करून किंवा मुद्दाम खेळत नाही. जेव्हा मी क्षेत्ररक्षणाची रचना पाहतो, आणि जिथे मला स्वत:साठी जागा बनवून फटके मारण्याची संधी दिसते, तेव्हा ते फटके आपोआप खेळले जातात,’’ असे अभिषेकने सांगितले.
