Abhishek Sharma- Ishan Kishan At Siddhi Vinayak Temple: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली होती. सर्व सामने जिंकून भारताने सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होतं. पण पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सेमी फायनलमध्ये जाणं कठीण होतं. पण भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. आता भारतीय संघाचा सेमी फायनलचा सामना बलाढ्य इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी अभिषेक शर्मा आणि इशान किशनने दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली आहे.

भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी तुफान फॉर्ममध्ये होता. पण स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो शून्यावर माघारी परतला. आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तर दुसरीकडे दमदार फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशननेही बाप्पाचं दर्शन घेतलं. या सलामीवीर फलंदाजांच्या जोडीला अक्षर पटेल देखील होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे, आऊट ऑफ फॉर्म असलेला संजू सॅमसन फॉर्ममध्ये परतला आहे. गेल्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्याने दमदार खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं होतं. पण शेवटच्या षटकात त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आणि भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. संजू सॅमसन सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला होता. पण शेवटी त्याला सूर गवसला आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्येही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

भारतीय संघाचा भारतात इंग्लंडविरुद्ध खेळताना रेकॉर्ड दमदार राहिला आहे. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ मायदेशात १६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १० सामने जिंकले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ २ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १ सामना जिंकला आहे, तर १ वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे.