Abhishek Sharma credited Shubman Gill and his bat for his century : अभिषेक शर्मा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात खाते न उघडता बाद झाला होता. त्यानंतर त्याच्यावर विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मात्र कारकिर्दीतील अवघ्या दुसऱ्या सामन्यात अभिषेकने शानदार शतक झळकावून सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या बॅटने दिली. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अभिषेकने शानदार शतक झळकावले. आता अभिषेकने एक मोठा खुलासा केला असून त्याच्या शतकाचा शुबमन गिलशी संबंध असल्याचे म्हटले आहे. खरं तर, शतक झळकावल्यानंतर, भारतीय सलामीवीराने खुलासा केला की तो शुबमन गिलच्या बॅटने खेळत होता, ज्यासाठी अभिषेकने बॅटचे विशेष आभार मानले. असे तो अनेकदा करतो असे अभिषेकने सांगितले. आयपीएलमध्येही अभिषेकने गिलकडे अनेकदा बॅट मागितली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये अभिषेकने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०० धावांची वादळी खेळी साकारली, ज्यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला. 'मी शुबमन गिलच्या बॅटने खेळलो' - बॅटबाबत अभिषेकने मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितले की, "आज मी शुबमन गिलच्या बॅटने खेळलो. त्यामुळे बॅटचेही आभार. मी १२ वर्षांखालील संघात असल्यापासून असे करत आलो आहे. जेव्हा जेव्हा मला वाटते की दबावाचा सामना आहे किंवा असा सामना ज्यामध्ये मला चागंली कामगिरी करावीच लागेल. अशा प्रत्येक वेळेस मी त्याची बॅट घेतो. इतके नव्हे तर मी आयपीएलमध्येही त्याच्याकडून एक बॅट घेऊन ठेवतो. त्याने मला ही बॅट दिली. त्यामुळे मला वाटते की ही शतकी खेळी साकारु शकलो." हेही वाचा - IND vs ZIM 2nd T20 : रेकॉर्ड ब्रेकिंग विजयानंतर शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला,”आज काय होणार आहे हे…” मोठे फटके खेळण्याचे श्रेय वडिलांना दिले - शतक झळकावल्यानंतर अभिषेकने मोठे फटके खेळण्याचे श्रेय वडिलांना दिले. त्याने सांगितले की त्याच्या वडिलांनी प्रशिक्षकाला जास्त हस्तक्षेप करण्यापासून कसे रोखले. अभिषेक म्हणाला, "माझ्या वडिलांचा विशेष उल्लेख करतो, ज्यांनी माझ्या लहानपणी प्रशिक्षकाला जास्त हस्तक्षेप करू दिला नाही. ते नेहमी मला मोठे फटके खेळायला सांगायचे. पण एक गोष्ट ते मला नेहमी सांगायचे की, तुला उंच फटके खेळायचे असतील तर, मग ते सीमेपलीकडे गेले पाहिजे." हेही वाचा - IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा अभिषेकने झळकावले तिसरे वेगवान शतक – झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा अभिषेक केएल राहुलसह संयुक्तपणे तिसरा भारतीय ठरला आहे. केएल राहुलनेही ४६ चेंडूत शतक झळकावले. त्याचबरोबर या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने ३५ चेंडूत हा पराक्रम केला. दुसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादव आहे, ज्याने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. या काळात अभिषेकचा स्ट्राइक रेट २१२.७७ होता. त्याने ऋतुराज गायकवाडबरोबर दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची शतकी भागीदारी केली.