Abhishek Sharma on Ishan Kishan partnership Ind vs WI: भारताचे स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात शतकी भागीदारी साकारत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या भागीदारीच्या बळावर भारताने २२३ धावांची मजल मारली आणि वेस्ट इंडिजवर शानदार विजय मिळवला. इशान व अभिषेक जेव्हा मैदानावर भागीदारी रचत असतात तेव्हा हे दोघे कसे असतात, याबाबत अभिषेकने वक्तव्य केलं आहे.
अभिषेक आणि इशान बऱ्याच काळापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांची मैत्री केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपुरती मर्यादित नसून, दोघेही आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतात. दोघांमधील मैत्री इतकी घट्ट आहे की, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांना फारसं बोलण्याची गरज पडत नाही. विशेषतः ईशान फलंदाजीसाठी मैदानात उतरतो, तेव्हा सुरुवातीच्या काही चेंडूंमध्ये त्याच्यावर दबाव असतो. अशा वेळी त्याला सहज खेळता यासाठी अभिषेक प्रयत्न करतो.
इशान किशनबाबत अभिषेक शर्मा काय म्हणाला?
इंदूरमधील सामन्यात भारताच्या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना अभिषेकने ईशानबरोबरच्या मैत्रीबद्दल सांगितलं, “सर्वात आधी सांगायचं तर, इशान फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर इतक्या सहजासहजी हसत नाही. त्यामुळे मला त्याला हसवावं लागतं आणि थोडं रिलॅक्स करावं लागतं. कारण फलंदाजीला आल्यावर तो स्वतःच्या विश्वात रमलेला असतो. मला वाटतं, आमच्यात खूप चांगलं नातं आहे. आयपीएलमध्येही आम्ही एकत्र अनेक भागीदारी रचल्या आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो.”
ईशानच्या फलंदाजीतील सुरुवातीच्या दबावाबाबत बोलताना अभिषेक म्हणाला, “ईशान जेव्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, तेव्हा पहिल्या एक-दोन चेंडूंमध्ये त्याच्यावर थोडा दबाव असतो, असं मला वाटतं. हा दबाव दूर करण्यासाठी आणि त्याने नेहमीप्रमाणे नैसर्गिक खेळण्यासाठी मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षभरातील त्याची कामगिरी पाहता, मैदानात असताना आम्ही खेळपट्टीची परिस्थिती किंवा इतर गोष्टींबद्दल फारशी चर्चा करत नाही. आम्ही एकमेकांच्या फलंदाजीचा आनंद घेतो आणि एकमेकांच्या खेळाला पूरक ठरतो.”
या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर १४ धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताने दिलेल्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ७ बाद २०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करत संघाला हा विजय मिळवून दिला. मालिकेतील चौथा टी-२० सामना १४ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.
