अफगाणिस्तानतर्फे राजधानी दिल्लीत आयोजित टी२० मालिकेच्या पहिल्या लढतीत अभिषेक शर्मारुपी वादळासमोर अफगाणिस्तानचा संघ निष्प्रभ ठरला. पन्नाशी गाठण्याआधीच निम्मा संघ तंबूत परतलेल्या अफगाणिस्तानने ओमरझाईच्या अर्धशतकाच्या बळावर दीडशेचा टप्पा ओलांडला. पण अभिषेक शर्माच्या झंझावाती खेळासमोर ते निरुत्तर ठरले.

भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. अनुभवी जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये गुरबाझला बाद केलं. इशान किशनच्या थ्रो मुळे इब्राहिम झाद्रान रनआऊट झाला. अर्शदीप सिंगने सेदिउल्ला अटलला बाद केलं. अक्षर पटेलने गुलबदीन नईबला तंबूचा रस्ता दाखवला. वरुण चक्रवर्तीची फिरकी दार्विश रसूलीला कळलीच नाही. ४३/५ अशी अवस्था झालेल्या अफगाणिस्तानला ओमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी सावरलं. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ५८ चेंडूत ८३ धावांची भागीदारी केली. अर्शदीपने नबीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३३ धावा केल्या. ओमरझाईने फटकेबाजी सुरुच ठेवली. शिवम दुबेने टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने २१ धावा कुटल्या. अफगाणिस्तानने १५६ धावांची मजल मारली. भारतातर्फे अर्शदीप सिंगने ३ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अनुभवी संजू सॅमसन १० धावा करून तंबूत परतला. मात्र यानंतर अभिषेक शर्माने फटक्यांचा पेटाराच उघडला. मैदानात चौफेर चौकार-षटकारांची आतषबाजी करत अभिषेकने अफगाणिस्तानच्या आक्रमणाला निष्प्रभ ठरलं. त्याला इशान किशनने चांगली साथ दिली. या जोडीने ५३ चेंडूत १२१ धावांची भागीदारी केली. ३२ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांसह ८२ धावांची खेळी करून अभिषेक बाद झाला. इशान किशन ४२ धावा करून बाद झाला. रशीद खानने बाऊंड्रीजवळ त्याचा थरारक झेल टिपला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अभिषेकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.