Abhishek Sharma on First T20 WC 2026 Fifty: अभिषेक शर्माची बॅट टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये अखेरीस तळपली आहे. झिम्बाब्वेविरूद्धचा सामना हा भारतासाठी स्पर्धेतील करो या मरो सामना आहे. या सामन्यात टीम इंडिया नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरली आणि संघाने यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. अभिषेक शर्मानेही या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. वर्ल्डकपमध्ये तीन वेळा डकवर बाद झाल्यानंतर अर्धशतकी खेळी केल्यानंतर काय म्हणाला, जाणून घेऊया.

अभिषेक शर्माने सावध सुरूवात केली, पण प्रसंगी त्याने मोठे फटकेदेखील खेळले. अभिषेकने २६ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक झळकावलं. हे अभिषेकचं टी-२० विश्वचषकातील पहिलं अर्धशतक ठरलं. अभिषेक यापूर्वी स्पर्धेत तीन वेळा शून्यावर बाद झाला तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने १५ धावांची खेळी केली. पण झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात त्याने त्याचा डाव साकारला. अभिषेकने संजू व इशान किशनबरोबर उत्कृष्ट भागीदारी रचत पॉवरप्लेमध्येच संघाला ८० धावांचा टप्पा गाठून दिला होता. त्यानंतर अभिषेक ३० चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावा करत बाद झाला. या खेळीनंतर त्याने संघाने त्याचं मनोबल कसं उंचावलं याबाबतही सांगितलं.

अभिषेक शर्मा अर्धशतकी खेळीनंतर नेमकं काय म्हणाला?

अभिषेक शर्मा या अर्धशतकी खेळीनंतर म्हणाला, “संघासाठी योगदान देता आलं की नेहमीच आनंद होतो. मी या क्षणाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होतो आणि अखेर तो आला, याचा मला खूप आनंद आहे.”

“मी मुद्दाम गती कमी केली असं नाही, पण मला थोडा वेळ खेळपट्टीवर घालवायचा होता. कारण या संपूर्ण स्पर्धेत मला १०-१२ चेंडूही खेळायला मिळाले नव्हते. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्यायचा होता. संघाचा खास उल्लेख करेन, त्यांनी मला जसं सावरून सांभाळून घेतलं आहे. त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की मी धावा करत नाही म्हणून संघापासून दूर आहे. सराव सत्रांमध्ये आणि हॉटेलमध्येही सगळेजण मला सतत सांगत होते की, ‘तू आधीही हे करून दाखवलं आहेस, तुझी पण वेळ येईल. फक्त विश्वास ठेव.’ आणि अखेर ते खरं ठरलं”, असं अभिषेक शर्मा संघाबाबत म्हणाला.

संघाच्या कामगिरीबाबत अभिषेक म्हणाला, “डावाच्या शेवटी ज्या पद्धतीने फलंदाजी झाली, ती एखाद्या व्हिडिओ गेमसारखीच वाटत होती. संघाचा आत्मविश्वास आणि आक्रमकता परत आली आहे, जसं आम्ही संपूर्ण वर्षभर खेळत आलो आहोत. काल आम्ही फलंदाजी गट म्हणून ठरवलं होतं की पुरेसे चेंडू पाहिल्यानंतर स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करायचं. कदाचित सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही, पण आमचा प्लॅन तसाच होता, सरावातही आम्ही त्यावर काम केलं होतं. फलंदाज म्हणून आणि एक फलंदाजी युनिट म्हणून आम्हाला मोकळेपणाने खेळायचं आहे. संपूर्ण वर्षभर आम्ही असंच खेळलो आहोत आणि पुढेही एकमेकांना साथ देत तसंच खेळणार आहोत.”