Vaibhav Sooryavanshi Abhishek Sharma Video: वैभव सूर्यवंशीचं बहुप्रतिक्षित असं भारताकडून टी-२० मध्ये पदार्पण झालं आहे. शनिवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे अभिषेक शर्मासोबत सलामीला फलंदाजी करण्यासाठी वैभव मैदानात उतरला. मात्र, आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याला केवळ १४ धावा करता आल्या. संजू सॅमसनच्या जागी वैभवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. जेव्हा वैभव अभिषेक शर्मासोबत फलंदाजी करत होता, तेव्हा त्यांना नवीन चेंडू खेळताना काही अडचणी येत होत्या. त्यानंतर अभिषेकने वैभवाला खेळपट्टी आणि चेंडूबाबत काही शंका विचारल्या, त्याच्यातील संभाषणाचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर तो खेळण्यासाठी उतरला. त्याने एक धाव घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या धावांचं खातं उघडलं. वैभवला मोठे फटके खेळण्यासाठी काही चेंडूंचा सामना करावा लागला, यानंतर त्याने जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार लगावला. मँचेस्टरची खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल होती. या परिस्थितीत, अभिषेकने खेळपट्टी आणि चेंडूबाबत वैभवचा सल्ला घेतला; हा संवाद स्टंप माईकमध्ये कैद झाला.
स्ट्राईकवर उभा असलेल्या अभिषेकने वैभवला विचारलं, “मी चेंडू सरळ मारू की मागच्या बाजूला खेळू? तुला काय वाटतं?” यावर वैभव सूर्यवंशी म्हणाला, “चेंडूचा अंदाज नीट घे. कारण चेंडू डबल बाऊन्स होतोय. या चेंडूचा वेग कमी होता आणि त्याची उसळीही कमी होती.” वैभव आणि अभिषेक यांच्यातील या संभाषणाने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुकरचा मोठा विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. अवघ्या १५ वर्षे आणि ९९ दिवस वय अशताना ही कामगिरी करत त्याने दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. सचिन तेंडुलकरने वयाच्या १६ वर्षे आणि २०५ दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत १९० धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून, जेकब बेथलच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने सहा चेंडू शिल्लक असतानाच १९१ धावा करून विजयी लक्ष्य गाठलं. या विजयासह यजमान इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
