मनमुराद फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माकडून झिम्बाब्वे दौऱ्यात मोठ्या अपेक्षा होत्या. संजू सॅमसन संघात नसल्याने अभिषेक शर्मावर दमदार सलामी देण्याची जबाबदारी होती मात्र झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझाराबानीने चोख अभ्यास करून तिन्ही सामन्यात त्याला तंबूत धाडलं.
गेले दीड ते दोन वर्षात अभिषेक शर्माने खणखणीत फटकेबाजीसह भारतीय संघाला चांगली सलामी करून दिली आहे. अभिषेकच्या झंझावाती फॉर्ममुळेच यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांची टी२० वर्ल्डकपसाठी संघात निवड होऊ शकली नाही. ताकदवान फटकेबाजीऐवजी सहजसुलभ फटकेबाजी हे अभिषेकचं वैशिष्ट्य आहे. झिम्बाब्वे संघव्यवस्थापनाने भारताच्या या हुकूमी एक्क्याला हुशारीने रोखलं.
रविवारी उंचपुऱ्या मुझाराबानीने ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू टाकला. अभिषेकने डाऊन द ट्रॅक येत तो कव्हरच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला.अभिषेक अनेकदा फटके खेळण्यासाठी जागा मिळावी यासाठी डाऊन द ट्रॅक येतो. यामुळे गोलंदाजांवर दडपण येतं. आयत्यावेळी टप्प्यात बदल करता येत नाही. मुझाराबानीने हुशारीने चेंडू फेकला. अँगलमुळे अभिषेकने खेळलेला फटका कड घेऊन मागे विकेटकीपरकडे गेला. अभिषेक २ धावा करू शकला.
पहिल्या सामन्यात मुझाराबानीने अभिषेकला मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. मात्र फटक्यासाठी आवश्यक वेळ आणि जागा नव्हती. अँगलमुळे अभिषेकने मारलेला फटका पॉइंटला उभ्या असलेल्या ब्रॅड इव्हान्सच्या हातात गेला. एक धाव करून तो तंबूत परतला.
दुसऱ्या सामन्यात मुझाराबानीच्या वेगाचा उपयोग करून घेण्याचा अभिषेकचा प्रयत्न होता. मात्र त्याने मारलेला फटका बॅकवर्ड पॉइंटला रायन बर्लच्या हातात गेला. त्याने ८ धावा केल्या. आयपीएलमध्ये पाटा खेळपट्ट्यांवर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या अभिषेकला झिम्बाब्वे दौऱ्यात मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागला. २५वर्षीय अभिषेकने ५५ सामन्यात १८७.८७च्या स्ट्राईकरेटने १६२७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
