Fastest Team Hundred In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १७ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पावरप्लेच्या षटकात पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यासह १०० धावांचा पल्ला गाठताच मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन मुल्लानपूरच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आली. दोघांनी नेहमीप्रमाणे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यादरम्यान हैदराबादने पावरप्लेच्या शेवटच्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला. यासह हैदराबादचा संघ आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद सांघिक शतक झळकावणाऱ्या संघांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी देखील हैदराबादचा संघ आहे. हैदराबादने ५.५ षटकात म्हणजेच ३५ चेंडूत शतक पूर्ण केलं.
याआधी २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने ३० चेंडूत १०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३४ चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. आज हैदराबादने तिसरं सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०१४ मध्ये पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३६ चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळताना ३६ चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर याच वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ३८ चेंडूत शतक पूर्ण केलं आहे.
आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद १०० धावा करणारे संघ
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – १०३(३०) २०२४
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- १०१(३४) -२०२४
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज- १०४(३५) २०२६*
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज- १०० (३६) २०१७
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- १०५ (३६) २०१७
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -१०२ (३८) २०२६
