Abhishek Sharma Revealed He Used Another Player Bat for Final: टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली आणि भारताने पॉवरप्लेमध्येच ९२ धावांचा डोंगर उभारला. संपूर्ण स्पर्धेत अभिषेक शर्माच्या बॅटमधून धावा येत नसल्याने सातत्याने टीका होत होती. त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण फायनलमध्ये मात्र संजू सॅमसनच्या साथीने त्याने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पण भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर अभिषेक शर्माने मोठा खुलासा करत सांगितलं की त्याने या खेळाडूच्या बॅटने फलंदाजी केली होती.

तीन वेळा शून्यावर बाद होत टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरूवात केल्यानंतर अभिषेक शर्मासाठी शेवट मात्र गोड झाला. अभिषेक शर्माने फायनलमध्ये २१ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने अंतिम सामन्यात ३ षटकार आणि ६ चौकार मारले. त्याच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर भारताने २५५ धावा केल्या आणि अखेर ९६ धावांनी सामना जिंकला.

भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर अभिषेक शर्माबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. अभिषेक शर्माने स्वत: सांगितलं की तो अंतिम सामन्यात स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्या खेळाडूच्या बॅटने खेळत होता. त्याने दुसऱ्या खेळाडूकडून बॅट उधार घेतली आणि फलंदाजी केली. अभिषेक शर्माने व संजू सॅमसनने सुरूवातीच्या दोन षटकांमध्ये सावध सुरूवात केली, पण त्यानंतर पॉवरप्लेमधील पुढच्या ४ षटकांत गोलंदाजांची धुलाई करत ६ षटकांत ९२ धावांचा विक्रम आकडा गाठला. टी-२० विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.

अभिषेक शर्माने कोणत्या फलंदाजाच्या बॅटने फायनलमध्ये केल्या धावा?

टी-२० विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर अभिषेक शर्माने खुलासा केला की त्याने फायनलमध्ये शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. तो म्हणाला, “आज मी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. सकाळी मला वाटलं की मी काहीतरी वेगळे करून पाहावं. गिल आता संघात नव्हता, म्हणून मी दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट घेतली. धन्यवाद, दुबे.

अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फक्त १८ चेंडूत अर्धशतक झळकावलं. २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरलं. अभिषेक आणि सॅमसन यांनी ९८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताच्या जेतेपदाच्या विजयाचा पाया रचला गेला. त्यानंतर न्यूझीलंड संघाने १८षटकांत ९ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार सूर्याने अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी अभिषेकला दिली आणि त्याने अखेरची १०वी विकेट घेत संघाचा वर्ल्डकप विजय निश्चित केला.

अभिषेक शर्मासाठी ही स्पर्धा निराशाजनक राहिली. जगातील नंबर १ फलंदाज अभिषेक शर्माने टी२० विश्वचषकात १७.६ च्या सरासरीने फक्त १४१ धावा केल्या आणि तीन वेळा शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्माची फलंदाजांमध्ये सर्वात कमी सरासरी होती. पण, जेतेपदाच्या लढतीत त्याने आपलं कौशल्य सिद्ध केलं आणि सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली.