Abhishek Sharma World Record T20I India vs West Indies: अभिषेक शर्मा आणि पहिल्या षटकात षटकार हे समीकरण वेगळंच आहे. कमी वेळात अनेक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या अभिषेकने वेस्ट इंडिजविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. रांचीमध्ये सुरू असलेल्या सामन्यात अभिषेकने अकील हुसेनविरुद्ध पहिल्याच षटकात आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली आणि अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार खेचत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने इनसाइड-आउट फटका मारत चेंडू थेट सीमापार षटकारासाठी पाठवला. हा षटकार लगावत अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या डावातील पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. अभिषेकने सामन्याच्या पहिल्या षटकात आतापर्यंत १४ षटकार लगावले आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय डावाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम

शुक्रवारच्या सामन्यातील पहिला षटकार मारताच अभिषेकने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिला. डावाच्या पहिल्या षटकात मारलेला हा त्याचा १४वा षटकार ठरला. या विक्रमासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला.

अभिषेकने आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आणि वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हिन लुईस यांना मागे टाकलं. या दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय डावांच्या पहिल्या षटकात प्रत्येकी १३ षटकार मारले होते. भारताकडून आपला ६३वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळताना अभिषेकने हा विक्रम आपल्या नावावर केला.

टी-२० सामन्यातील पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

अभिषेक शर्मा – १४ षटकार
पॉल स्टर्लिंग – १४ षटकार
एव्हिन लुईस – १४ षटकार
रोहित शर्मा – १२ षटकार
मार्टिन गप्टिल – १२ षटकार

रांचीमध्ये अभिषेक शर्माची आक्रमक खेळी अवघ्या १२ चेंडूंमध्ये संपली, मात्र या छोट्या खेळीतही त्याने टीम इंडियासाठी आणखी एक विक्रम नोंदवला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात २० धावांची खेळी करताना अभिषेकने भारतातील मैदानांवर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने या खेळीदरम्यान एक षटकार आणि दोन चौकार मारले.

संजू सॅमसनला सुरुवातीला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना अभिषेकने मात्र प्रत्येक चेंडू सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केला. पण रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचा चेंडू नीट बॅटवर आला नाही आणि तो झेलबाद झाला. अशा प्रकारे या मालिकेत दुसऱ्यांदा अभिषेकला स्वस्तात माघारी परतावं लागलं.