गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४०८ धावांनी दारुण पराभवानंतर भारतीय संघावर जोरदार टीका होत आहे. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या खेळण्यावर टीका केली आहे.

‘भारतीय संघाने सपशेल लोटांगणच घातलं. फलंदाजांनी निर्धाराने खेळायला हवं होतं. तंत्रात बदल करायला हवे होते. बॅटपॅड एकत्र ठेऊन खेळायला हवं होतं. रवींद्र जडेजाने या खेळपट्टीवर कसं खेळायचं ते दाखवलं. बाकी खेळाडूंनी दुर्देवाने यातून काहीच बोध घेतला नाही. चारही डाव पाहिले तर भारतीय संघांनी ८३.५ षटकं फलंदाजी केली. त्यापैकीही कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीच प्रामुख्याने फलंदाजी केली’, जिओ हॉटस्टारशी बोलताना कुंबळे यांनी परखडपणे आपलं मत मांडलं.

भारतीय संघाचं धोरण आणि निवड यावरही कुंबळे यांनी टीका केली. ‘हारजीत होत राहते पण लढणं आवश्यक असतं. भारतीय संघाने जराही संघर्ष केला नाही. कसोटी क्रिकेट खेळताना वेगळी मानसिकता लागते, ती दिसली नाही. संघात ढिगावरी अष्टपैलू खेळाडू घेऊन गोष्टी बदलत नाहीत. संघात सतत बदल करूनही काही होत नाही. प्रत्येक सामन्यात कोणीतरी पदार्पण करतं, कोणाला तरी काढलं जातं. याने संघाचं संतुलनच ढासळतं’, असं कुंबळे म्हणाले.

‘भारतीय संघ पुढची कसोटी ऑगस्ट २०२६ मध्ये खेळणार आहे. भारतीय संघव्यवस्थापनाकडे पुरेसा वेळ आहे. पण ही मालिका विसरता कामा नये. भारतीय संघ पुढे कशी वाटचाल करणार याविषयी बसून ठोस चर्चा करायला हवी. मोठ्या खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली आहे. जेव्हा असं होतं तेव्हा सम्यक विचार करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करून मार्ग काढायला हवा’, असं कुंबळे यांनी सांगितलं.

कुंबळे यांनी संघनिवडीवरही टीका केली आहे. ‘सतत बदल करत राहिलो तर खेळाडू स्वत:ला कसं विकसित करणार? एखादा अनुभवी खेळाडू आणि बाकी सगळे नवीन असं असू शकत नाही. कारण त्याने ताळमेळ साधत नाही. नवीन खेळाडूंना कसोटी क्रिकेटचा अंदाज यायला वेळ द्यायला हवा. सतत बदल केले की अस्थिरता निर्माण होते. गेल्या वर्षी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश अनुभवला. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. दुर्देवाने भारतासाठी हे पुन्हा झालं आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाज बदलले, पण निर्णय तोच आहे. या खेळपट्ट्या चांगल्या होत्या. खेळपट्टीचा नूर ओळखून खेळायला हवं होतं’, असं कुंबळे म्हणाले.