पीटीआय, चेन्नई : जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा हे प्रमुख खेळाडू ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकणे हा भारतीय संघासाठी धक्का असला, तरी त्यांची अनुपस्थिती ही इतरांसाठी संधी असेल, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. वेगवान गोलंदाज बुमराला पाठीच्या, तर अष्टपैलू जडेजाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. हे दोन तारांकित खेळाडू उपलब्ध नसतानाही भारतीय संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, असा शास्त्री यांना विश्वास आहे.

‘‘क्रिकेट सामन्यांची संख्या आता खूप वाढली आहे. त्यामुळे खेळाडू जायबंदी होतात. बुमराची दुखापत हा मोठा धक्का असला, तरी अन्य खेळाडूंसाठी ही संधी असेल. दुखापतीवर तुमचे नियंत्रण नसते. मात्र आपला संघ मजबूत आहे. कोणत्याही स्पर्धेत तुम्ही सर्वात आधी उपांत्य फेरी गाठणे गरजेचे असते. त्यानंतर कोणताही संघ विजेता ठरू शकतो. त्यामुळे स्पर्धेची दर्जेदार सुरुवात करून उपांत्य फेरी गाठणे हे भारताचे लक्ष्य असले पाहिजे. त्यानंतर विश्वचषक जिंकण्याची भारतीय संघात नक्कीच क्षमता आहे. भारताला बुमरा आणि जडेजा यांची उणीव नक्कीच जाणवेल. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंना नाव कमावण्याची संधी आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघात जायबंदी बुमराची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या दोघांपैकी शमीला ऑस्ट्रेलियात सामने खेळण्याचा अधिक अनुभव असून याचा भारतीय संघाला फायदा होईल, असे शास्त्री यांना वाटते. ‘‘गेल्या सहा वर्षांत भारतीय संघाने अनेकदा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला असून या दौऱ्यांमध्ये शमीने कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलियात यापूर्वी यशस्वी कामगिरी केल्याचा शमीला आता फायदा होऊ शकेल,’’ असे शास्त्री यांनी नमूद केले.

महिला ‘आयपीएल’ महत्त्वपूर्ण संकल्पना!

पुढील वर्षी महिलांच्या ‘आयपीएल’ला सुरुवात होणार असून ही स्पर्धा भारतीय संघासाठी लाभदायी ठरेल, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. ‘‘महिला ‘आयपीएल’ ही महत्त्वपूर्ण आणि अप्रतिम संकल्पना आहे. भारतीय महिला संघ मोठी जागतिक स्पर्धा जिंकण्यापासून फार दूर नाही. भारताने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर देशातील पुरुष क्रिकेट कोणत्या उंचीवर पोहोचले, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाला विश्वचषक जिंकण्यात यश आल्यास देशात महिला क्रिकेटला वेगळीच लोकप्रियता निर्माण होईल,’’ असे शास्त्री म्हणाले.