१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. सालाबादप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आणि भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा जनतेसमोर मांडला. त्यात मोदींनी क्रीडा क्षेत्राचा आवर्जून उल्लेख केला. क्रीडा क्षेत्रात घराणेशाही आणि खेळाडूंच्या निवड प्रक्रियेची काय भूमिका आहे? हे त्यांनी स्पष्ट केले. अलिकडच्या काळात भारताने क्रीडा क्षेत्रात चांगली भरारी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या यशाचे श्रेय निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेला दिले आहे. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले, "नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केले. असे नाही की, आपल्याकडे पूर्वी प्रतिभा नव्हती. परंतु, आता घराणेशाहीशिवाय झालेल्या पारदर्शक निवडीमुळे भारताला पदके मिळवण्यात यश मिळत आहे." खेळातील घराणेशाही संपुष्टात आणली पाहिजे, यावर पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही भर दिला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, गुजरात सरकारने आयोजित केलेल्या 'खेल महाकुंभ' या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या ११व्या आवृत्तीत बोलताना ते म्हणाले होते की, राजकारणात जशी घराणेशाही असते, तशीच क्रीडाक्षेत्रातही होती. हा एक मोठा घटक होता. त्यामुळे अनेक खेळाडूंची प्रतिभा वाया गेली. मात्र, खेळाडूंच्या निवडीमध्ये पारदर्शकतेचा अभाव ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे. हेही वाचा - ‘देशाचं नाव बदलून…’ मोहम्मद शमीच्या पत्नीचं पंतप्रधान मोदींना आवाहन बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २२ सुवर्ण, १६रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह ६१ पदके मिळवली होती. पंतप्रधान मोदींनी शनिवारी (१३ ऑगस्ट) त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार आयोजीत केला होता. खेळाडू बर्मिंगहॅमला रवाना होण्यापूर्वीही पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला होता.