BCCI contacted Ishan Kishan during the Test series : बीसीसीआयची वार्षिक केंद्रीय करार यादी जाहीर झाल्यापासून लक्ष वेधून घेणारी दोन नावे म्हणजे श्रेयस अय्यर आणि इशान किशन. हे दोन्ही स्टार खेळाडू गेल्या काही काळापासून भारतीय योजनेचा भाग आहेत, परंतु असे असूनही त्यांना बीसीसीआयच्या करारातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या त्यांच्या अनिच्छेने बीसीसीआयला दोघांनाही केंद्रीय करारातून वगळावे लागले.

इशान-श्रेयसवर कारवाई का करण्यात आली?

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून वगळण्या मागील कोणतेही अधिकृत कारण समोर आले नसले, तरी बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात इशान आणि श्रेयसच्या प्रकरणाबाबत जोरदार संकेत देण्यात आले होते. बीसीसीआयने लिहिले होते की, बोर्डाने शिफारस केली आहे की सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करता नसताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्यास प्राधान्य द्यावे.

टीम मॅनेजमेंटने इशानशी केली होती चर्चा –

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने इशान किशनशी संपर्क साधला होता. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, किशनने उत्तर दिले की तो अद्याप तयार नाही. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला संधी मिळाली आणि त्याने चौथ्या कसोटीत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आता इशानचे पुनरागमन अवघड वाटत आहे. अलीकडेच रोहितनेही नाव न घेता इशान आणि श्रेयसवर निशाणा साधला होता. रोहित म्हणाला होता- ‘ज्यांना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि संघाकडून खेळण्याची भूक आहे, त्यांनाच संधी दिली जाईल.’

हेही वाचा – IPL 2024 : सर्फराझ खानला दिल्ली कॅपिटल्सने का रिलीज केले? सौरव गांगुलीने सांगितले कारण

इशानने नाव मागे घेतले होते –

यापूर्वी इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर बीसीसीआयने १७ डिसेंबरला सांगितले होते की, ‘इशानने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून मुक्त करण्याची विनंती केली होती.’ यानंतर या यष्टीरक्षकाला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले. राष्ट्रीय संघापासून दूर राहिल्यानंतर इशानने देशांतर्गत क्रिकेट खेळणे अपेक्षित होते, परंतु त्याने रणजी ट्रॉफी सामने न खेळण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – IND vs ENG : रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये खास ‘त्रिशतक’ झळकावण्याच्या जवळ, ‘हा’ मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते की, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी इशानला देशांतर्गत क्रिकेट किंवा कोणतीही स्पर्धा खेळण्याची गरज आहे. मात्र, इशान किशनने या सूचनेकडे दुर्लक्ष केले. श्रेयस अय्यरने दुखापतीचे कारण सांगून रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांपासून दूर राहिला होता. मात्र, यानंतर श्रेयस पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला कोणतीही दुखापत नसल्याचे समोर आले. यानंतर बीसीसीआयने या दोघांवर तातडीने कारवाई करत त्यांना केंद्रीय करारातून वगळले. मात्र, श्रेयस सध्या मुंबईकडून रणजी उपांत्य फेरीचा सामना खेळत आहे.