चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) हा इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात लोकप्रिय संघापैकी एक आहे. चेन्नईच्या संघामध्ये महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजासारखे प्रसिद्ध खेळाडू आहेत. मात्र, आता रविंद्र जडेजा लवकरच संघातून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या १५व्या हंगामापासून रविंद्र जडेजा आणि सीएसके संघ व्यवस्थापन एकमेकांच्या संपर्कात नाही.

आयपीएलच्या १५व्या हंगामादरम्यान चेन्नई सुपर किंग्स आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यात अंतर्गत मतभेद झाले होते. मध्यंतरी जडेजाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सीएसकेसंदर्भातील सर्व पोस्ट काढून टाकल्या होत्या. तेव्हा हे मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता जडेजा संघातून बाहेर पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा – इयान चॅपेलने पुन्हा घेतली निवृत्ती! ४५वर्षांच्या कारकिर्दीचा झाला शेवट

परदेश दौर्‍यावरून परत आल्यानंतर जडेजा काही दिवस बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता. परंतु, यादरम्यान त्याने एकदाही सीएसकेशी संपर्क साधला नाही. इनसाइडस्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, जडेजाचा व्यवस्थापक इतर संघांशी ट्रेडिंग ऑफरबाबत चर्चा करत आहेत. ट्रेडिंग विंडोचा भाग झाल्यानंतर जडेजा इतर संघांशी बोलू शकतो. पण, त्याआधी जडेजा आणि सीएसकेच्या अधिकाऱ्यांमध्येही एक बैठक होणे गरजेचे आहे.

हेही वाचा – Video: “यांच्यापेक्षा गल्लीतरी पोरं बरी!” इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये संघ व्यवस्थापकांची एकमेकांना मारहाण

चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलच्या १५व्या हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही. हंगामाच्या सुरुवातीला अष्टपैलू जडेजाकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सतत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हंगामाच्या मध्यातच कर्णधारपदात बदल झाले होते. जडेजाला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्यापासूनच त्याने फ्रँचायझी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे.