गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. मुख्य सामन्यापूर्वी लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अपटॉनस्टील काउंटी मैदानावर एक सराव सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. अशातच, माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी मालदीववरून जाऊन आलेल्या विराट कोहलीच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता असे, म्हटले जात आहे.

गेल्यावर्षी जेव्हा भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता, तेव्हा संघातील काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. याशिवाय संघाच्या फिजिओलाही करोना झाला होता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. परिणामी भारतीय संघाला पाच सामन्यांची कसोटी मालिका अर्धवट सोडून माघारी यावे लागले होते. त्यावेळी पाच सामन्यांची अर्धवट राहिलेली मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ आता इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे.

हेही वाचा – Video : विराट कोहली पुन्हा कर्णधाराच्या भुमिकेत? सराव सत्रात दिले आवेशपूर्ण भाषण

टाइम्स ऑफ इंडियाने आणि आउटलूक इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आयपीएलनंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. तेव्हा तो मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेला होता. तिकडून आल्यानंतर त्याला करोना झाला होता. ‘लंडनमध्ये उतरल्यानंतर कोहलीने त्याची करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, सध्या विराट कोहली एकदम बरा आहे. शिवाय तो सरावही करत असल्याचे’ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय कसोटी संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अश्विन अद्याप भारतातच आहे. त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तो भारतीय संघात दाखल होणार आहे. अशातच आता विराट कोहलीबाबत करोनाचे वृत्त आल्यामुळे भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाल्याचे बोलले जात आहे.