Adam Zampa Record: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ केला आणि एकतर्फी विजयाची नोंद केली. दरम्यान ऑस्ट्रेलियाने दुसरा वनडे सामना ८४ धावांनी जिंकून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने दमदार शतक झळकावलं. या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांअखेर ३५६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेचा डाव अवघ्या २७२ धावांवर आटोपला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ॲडम झम्पाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

ॲडम झम्पाने मोडला शेन वॉर्नचा रेकॉर्ड

या सामन्यात धावांचा बचाव करताना ॲडम झम्पाने २ गडी बाद केले. यासह त्याने वनडे क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. ॲडम झम्पा हा वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून वनडे क्रिकेट खेळताना सर्वात जलद २०० गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या वनडे कारकिर्दीतील १२५ वनडे सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रेकॉर्ड शेन वॉर्नच्या नावावर होता. पण आता हा रेकॉर्ड शेन वॉर्नसारख्याच गोलंदाजी करणाऱ्या ॲडम झम्पाने मोडून काढला आहे.

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हा ॲडम झम्पाच्या वनडे कारकिर्दीतील १२३ वा वनडे सामना होता. यासह तो ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज बनला आहे. या डावात गोलंदाजी करताना त्याने झिम्बाब्वेच्या २ फलंदाजांना माघारी धाडलं. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद २०० गडी बाद करणाऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानच्या सकलैन मुश्ताकच्या नावावर आहे. सकलैन मुश्ताकने वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना १०४ सामन्यांमध्ये २०० गडी बाद केले होते. तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. राशिद खानने ११५ वनडे सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर १२३ सामन्यांमध्ये २०० गडी बाद करताच ॲडम झम्पा या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० गडी बाद करणारे फिरकी गोलंदाज

सकलैन मुश्ताक (पाकिस्तान) १०४ सामने
राशिद खान (अफगाणिस्तान) ११५ सामने
ॲडम झम्पा (ऑस्ट्रेलिया) १२३ सामने
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) १२५ सामने
आदिल राशिद (इंग्लंड) १३७ सामने
अब्दुल रज्जाक (बांगलादेश) १४१ सामने
अनिल कुंबळे (भारत) १४७ सामने
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) १४७ सामने
शाकिब अल हसन (बांगलादेश) १५६ सामने
हरभजन सिंग (भारत) १७८ सामने