लंडन : यॉर्कशायर कौंटी क्रिकेट संघातील माजी सहकारी अझीम रफिकने माजी कर्णधार मायकल वॉनवर लावलेल्या वर्णद्वेषाच्या आरोपाला इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने दुजोरा दिला आहे.

यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करताना वॉनने २००९ मध्ये एका सामन्यापूर्वी त्याच्याच संघातील रफिकसह अन्य आशियाई वंशाच्या खेळाडूंना उद्देशून वक्तव्य केले होते. ‘‘आपल्या संघात तुमच्यासारख्या खेळाडूंची संख्या वाढली आहे आणि याबाबत काही तरी केले पाहिजे,’’ असे म्हटल्याचा वॉनवर आरोप करण्यात आला. मात्र, वॉनने हा आरोप फेटाळून लावला असला तरी आता रफिकच्या आरोपांना सध्याच्या इंग्लंड संघाचा प्रमुख सदस्य रशीदने दुजोरा दिल्याने वॉनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात मला केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते. मात्र, अझीम रफिकने सांगितल्याप्रमाणे वॉनने आम्हा आशियाई वंशांच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी टिपण्णी केली होती हे मी आता स्पष्ट करू इच्छितो. व्यावसायिक खेळांसह रोजच्या जीवनात वर्णद्वेषाला थारा नाही. वर्णद्वेष थांबवण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे,’’ असे रशीद म्हणाला. रशीदच्या आधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राणा नावेद-उल-हसननेही रफिकला पाठिंबा दर्शवताना वॉनवरील आरोप खरा असल्याचे म्हटले होते.