गेल्या वर्षी कोविड-१९मुळे भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा अर्धवट सोडला होता. तो पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ पुन्हा इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. १ जुलै रोजी सुरू होणाऱ्या एजबस्टन कसोटीपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. सध्या भारतीय संघ लिसेस्टरशायर संघाविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. या दरम्यान रोहित शर्माच्या संघासाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. इंग्लंडचा दिग्गज फिरकी गोलंदाज आदिल राशिद भारताविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार नाही. या काळात राशिद हज यात्रेला जाणार आहे. त्यासाठी त्याला इंग्लंडच्या क्रिकेट नियामक मंडळाने (ईसीबी) आणि यॉर्कशायर क्लबने रजा मंजुर केली आहे.

जुलै महिन्यात राशिद हज यात्रेसाठी मक्केला जाणार आहे. यादरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. राशिद सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांना आपल्या गोलंदाजीने खूप त्रास दिला आहे.

हेही वाचा – Asad Rauf : आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंच आता विकतोय चपला आणि कपडे! का ते वाचा

राशिदच्या अनुपस्थितीत इंग्लंडची फिरकी गोलंदाजी कमकुवत होईल. त्याच्या जागी इंग्लंड कसोटी संघाचा भाग असलेल्या जॅक लीचची निवड होऊ शकते. याशिवाय, फिरकी गोलंदाजीसाठी मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन हेदेखील पर्याय संघ व्यवस्थापनाकडे उपलब्ध असतील.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला ७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना ९ जुलैला तर तिसरा सामना १० जुलैला होणार आहे. १२ जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. १७ जुलैला भारताचा इंग्लंड दौरा संपेल. यानंतर २२ जुलैपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. परिणामी, भारतीय संघ इंग्लंडमधूनच कॅरेबियन बेटांवर जाईल.