पीटीआय, कोलकाता : विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळामधून (बीसीसीआय) बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक होणार आहे. गांगुलीच्या जागी १९८३च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची ‘बीसीसीआय’मधील सर्वोच्च पदावर बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व गोष्टींवर अखेर गांगुलीने गुरुवारी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘प्रशासकाचा कार्यकाळ मर्यादितच असतो,’’ असे गांगुली म्हणाला.

‘‘तुम्ही कायम खेळू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही प्रशासक म्हणूनही आयुष्यभर कार्यरत राहू शकत नाही. मला क्रिकेट खेळण्याची आणि नंतर प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या दोन्ही भूमिका बजावताना मला खूप मजा आली. परंतु भविष्यात मला आणखी मोठे लक्ष्य गाठायचे आहे,’’ असे गांगुलीने सांगितले. ‘‘मी क्रिकेटपटूंच्या हिताचे निर्णय घेणारा प्रशासक होतो. क्रिकेटचे प्रमाण आता खूप वाढले आहे, तसेच खेळातील पैसाही वाढला आहे, त्यामुळे प्रशासक म्हणून तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. महिला क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटकडेही दुर्लक्ष होता कामा नये. त्यामुळे काही वेळा तुम्हाला वैयक्तिक निर्णय घेणे भाग पडते,’’ असेही गांगुली म्हणाला. 

गांगुली पुन्हा ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवण्यासाठी उत्सुक होता. मात्र, गेल्या आठवडाभरात झालेल्या ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये अध्यक्ष म्हणून गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे ३६वे अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावाला पसंती देण्यात आली. गांगुलीला ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्याबाबत विचारणा झाली, पण त्याने हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आता गांगुली ‘बीसीसीआय’मधून पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यता आहे. ‘‘मी आठ वर्षांपासून क्रिकेट प्रशासकाची भूमिका बजावतो आहे. मी बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यानंतर मला ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. या सर्व पदांसाठी कार्यकाळ असतात आणि कार्यकाळ संपल्यावर तुम्हाला बाहेर पडावेच लागते,’’ असे गांगुलीने नमूद केले.

कामगिरीबाबत समाधानी!

‘बीसीसीआय’चा अध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीबाबत गांगुली समाधानी आहे. ‘‘मला ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवताना खूप मजा आली. गेल्या तीन वर्षांत अनेक गोष्टी घडल्या आहेत. करोनामुळे देशभरात मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र, आम्ही या काळातही ‘आयपीएल’चे यशस्वीपणे आयोजन केले. प्रसारण हक्कांच्या लिलाव प्रक्रियेत विक्रमी बोली लावली गेली. भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली. राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या महिला संघाचे सुवर्णपदक हुकले. मात्र, त्यांनी ऑस्ट्रेलियाला उत्तम झुंज दिली आणि रौप्यपदक मिळवले. प्रशासक म्हणून माझ्यासाठी हे सर्वोत्तम क्षण होते. आता भारतीय पुरुष संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकात यशस्वी कामगिरी करेल अशी मला आशा आहे,’’ असे गांगुली म्हणाला.