अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत त्याची चांगली कामगिरी सुरु असून त्याने ६ सामन्यात १२ गडी बाद केले आहेत. या कामगिरीमुळे तो स्पर्धेतील गोलंदाजांच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र असं असताना राशिद खानला त्याच्या कुटुंबीयांची चिंता सतावत आहे. २२ वर्षीय राशिद खानचं कुटुंब अफगाणिस्तानात अडकले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर त्याची धाकधूक वाढली आहे. याबाबत त्याने वारंवार सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने स्काय स्पोर्टच्या समालोचनावेळी राशिदच्या भावना बोलून दाखवल्या. “राशीदच्या घरी खूप काही घटना घडत आहेत. याबाबत मी त्याच्याशी बोललो, मात्र तो खूपच चिंतातूर आहे. तो आपल्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यास सक्षम नाही. इतक्या तणावपूर्ण स्थितीत चांगलं प्रदर्शन करणं खरंच कठीण आहे.”, असं केविन पीटरसनने सांगितलं.

“मागच्या ५ वर्षात मी फक्त २५ दिवसच घरी जाऊ शकलो आहे. तीन वर्षात मी माझ्या आई आणि वडिलांना गमावलं आहे. मला माझ्या कुटुंबियांसोबत राहण्यासाठी तितका वेळ मिळाला नाही. ही माझ्या कारकिर्दीची सुरुवात आहे. यामुळे मला संघर्ष करावा लागत आहे”, असं राशिद खानने द हंड्रेड स्पर्धेपूर्वी भावना व्यक्त केल्या होत्या. रविवारी त्याने सोशल मीडियावर शांततेचं आवाहन करत अफगाणिस्तानचा झेंडा लावला होता.

राशिद खान जगभरातील टी २० लीगमध्ये खेळत आहे. २०१५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्ये राशिद सनराझर्ज हैदराबादकडून खेळत आहे.