Afghanistan T20 World Cup Squad: टी-२० विश्वचषक २०२६ येत्या ७ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका या संघांकडे आहे. स्पर्धेची तारीख जवळ येत असल्याने सहभागी देश आपल्या संघांची घोषणा करत आहेत. यादरम्यान आता अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तानने संघात ४० वर्षीय खेळाडूला संधी दिली आहे.

अफगाणिस्तानने रशीद खानला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. अष्टपैलू गुलबदीन नायब आणि वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक हे देखील खांद्याच्या दुखापतीतून सावरत एक वर्षानंतर संघात परतले आहेत. नवीनने डिसेंबर २०२४ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषक तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. विश्वचषकात सहभागी झालेला संघच वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकेत खेळताना दिसणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी १९ ते २२ जानेवारी दरम्यान युएईमध्ये अफगाण संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल.

शाहिद उल्लाह कमाल आणि यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद इशाक यांनी संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. युवा वेगवान गोलंदाज अब्दुल्ला अहमदझाईचाही संघात समावेश करण्यात आला आहे. १५ सदस्यीय संघात फजल हक फारुकीचाही समावेश करण्यात आला आहे. मुजीब उर रहमान हा संघातील लक्षवेधी खेळाडू आहे. याशिवाय संघाने दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला देखील संधी दिली आहे. नबी आता ४० वर्षांचा आहे.

एएम गझनफरला एजाज अहमदझाई आणि तरुण वेगवान गोलंदाज झिया उर रहमान शरीफी यांच्यासह राखीव गटात स्थान देण्यात आले आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये अफगाणिस्तानला न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, युएई आणि कॅनडासह ड गटात स्थान देण्यात आलं आहे. अफगाणिस्तान संघ ८ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळेल.

अफगाणिस्तानचा टी-२० विश्वचषक २०२६ साठी संपूर्ण संघ

रशीद खान (कर्णधार), इब्राहिम झादरान (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहिदुल्ला कमाल, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजल हक फारुकी आणि अब्दुल्ला अहमदझई.

राखीव खेळाडू: एएम गझनफर, इजाज अहमदझई आणि झिया उर रहमान शरीफी.