Afghanistan vs Canada: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील ३९ वा सामना अफगाणिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हे दोन्ही संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यामुळे या सामन्याचा सुपर ८ च्या निकालावर काही फरक पडणार नव्हता. पण शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने पूर्ण जोर लावला. या सामन्यात अफगाणिस्तानने कॅनडासमोर विजयासाठी २०१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कॅनडाचा डाव अवघ्या ११८ धावांवर आटोपला. यासह अफगाणिस्तानने हा सामना ८२ धावांनी आपल्या नावावर केला.

या सामन्यात कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने २० चेंडूत ३० धावांची खेळी केली. तर इब्राहिम झादरान शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने ५६ चेंडूत ९५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ५ षटकार खेचले. तर गुलबदीन नईम १ धाव करून माघारी परतला. शेवटी सेदीकुल्लाह अटलने ३२ चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ४ गडी बाद २०० धावा केल्या.

कॅनडाला हा सामना जिंकण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कॅनडाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. युवराज सामरा अवघ्या १७ धावा करत माघारी परतला. तर दिलप्रीत बाजवाने १३ धावा केल्या. नवनीत धलीवाल शून्यावर माघारी परतला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कॅनडाचे टॉप ३ फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. हर्ष ठकेरला चांगली सुरूवात मिळाली होती. पण तो ३० धावा करून माघारी परतला होता. तर निकोलस किरटॉनने १० धावा केल्या. तर साद बीन जफरने २८ धावा केल्या. कॅनडाचा संपूर्ण डाव अवघ्या ११८ धावांवर आटोपला.

अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद नबी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नबीने ४ षटकात अवघ्या ७ धावा खर्च करून ४ गडी बाद केले. तर कर्णधार राशिद खानने ४ षटकात १९ धावा खर्च करून २ गडी बाद केले. तर मुजीब उर रहमान आणि अजमतु्ल्लाह ओमरजाईने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. अफगाणिस्तानला या स्पर्धेतील ४ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. ४ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला.