अफगाणिस्तानने पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी थेट पात्र होण्याचा मान मिळवला आहे. कर्णधार रशीद खानच्या दिमाखदार प्रदर्शनाच्या बळावर अफगाणिस्तानने तिसऱ्या वनडेत आयर्लंडला नमवलं. या विजयासह अफगाणिस्तानचा संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. एकीकडे वेस्ट इंडिजसारख्या संघाला पात्रता फेरी खेळावी लागणार आहे, दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरला आहे.
बेलफास्ट इथे झालेल्या तिसऱ्या वनडेत आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांची मजल मारली. गॅव्हिने होयने ३६ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानने ३४ अतिरिक्त धावांची खिरापत वाटली. अफगाणिस्तानतर्फे गनफझर आणि रशीद यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.
रहमनुल्ला गुरबाझने ७१ धावांची खेळी करत अफगाणिस्तानच्या विजयाचा पाया रचला. मात्र दुसऱ्या बाजूने अफगाणिस्तानने सातत्याने विकेट्स गमावल्या. विजय दुरावणार असं चित्र असताना रशीद खानने नाबाद ३७ धावांची खेळी करत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरीसाठी रशीदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेत वनडे वर्ल्डकप होणार आहे. यजमान नात्याने हे दोन्ही संघ थेट पात्र ठरले आहेत. या दोन संघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका पात्र ठरले आहेत. उर्वरित चार संघ पात्रता फेरीच्या माध्यमातून निवडले जातील.
