India vs Afghanistan T20I Series Schedule Change: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. बीसीसीआयकडून अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. पण बीसीसीआयकडून वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर काही तासातच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार ही मालिका दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. या मालिकेतील ३ सामने १३,१५ आणि १७ सप्टेंबरला आयोजित केले जाणार आहेत. पण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
बुधवारी बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून भारत – अफगाणिस्तान हे दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर, दुसरा सामना १५ सप्टेंबरला आणि मालिकेतील शेवटचा सामना १७ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तान या मालिकेचं यजमानपद भुषवणार आहे. ही मालिका दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण अफगाणिस्तानला या मालिकेतील एक सामना हा १४ सप्टेंबरला खेळायचा आहे. त्यामुळे १३ किंवा १५ सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यापैकी एक सामना हा पुढे किंवा मागे करून १४ सप्टेंबरला खेळवला जाऊ शकतो.
नेमकं कारण काय?
अफगाणिस्तानला मालिकेतील एक सामना १४ सप्टेंबरला खेळायचा आहे. कारण यादिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बऱ्याचशा लोकांना सुट्टी असते, त्यामुळे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येऊ शकतात. मालिकेतील वेळापत्रकात बदल झाल्यास मालिकेतील सामने १३, १४ आणि १७ सप्टेंबरला खेळवले जातील. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी ही सराव मालिका असणार आहे.
बीसीसीआयने भारत – अफगाणिस्तान टी-२० मालिकेचं वेळापत्रक जाहीर करताच भारत – बांगलादेश मालिका होण्याच्या आशा मावळल्या आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेची घोषणा केली होती. ही मालिका ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाणार होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना बांगलादेशमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे २०२५ मध्ये होणारी मालिका पुढे ढकलण्यात आली होती.
