धनंजय रिसोडकर

गेल्या १० वर्षांत ज्या संघाने १२ कर्णधार पाहिले असतील, त्या संघातील अन्य खेळाडूंना कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागले असेल त्याचा विचारदेखील करता येत नाही. बरे जो कालच्या मालिकेत किंवा स्पर्धेत कर्णधार असतो, तो पुढच्या आव्हानाप्रसंगी राहात नाही. कुमार संगकारापासून सुरू झालेला हा राजकीय खेळ गेल्या तीन वर्षांत अधिकच टोकदार झाला आहे. २००९मध्ये संगकारा, त्यानंतर तिलकरत्ने दिलशान, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज (दोन वेळा), दिनेश चंडिमल, लाहिरु थिरीमाने, उपुल थरंगा, चामरा कपुगेद्रा, लसिथ मलिंगा (दोन वेळा), थिसारा परेरा आणि आता अगदी विश्वचषकापूर्वी दिमुथ करुणारत्ने याला कर्णधार करण्यात आले आहे. ज्या दिमुथला कर्णधारपद दिले, तो २०१५सालापासून श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा सदस्य नव्हता. केवळ तो कसोटीत चांगली फलंदाजी करीत आहे आणि शांत खेळाडू आहे, इतक्याच निकषावर त्याला कर्णधारपद देण्यात आले. तो संघातच नसल्याने त्याचे अन्य कुणाशी फारसे वाददेखील नाहीत, हीच काय ती त्याच्या दृष्टीने जमेची बाजू लक्षात घेऊन त्याला कर्णधार केले. वादविवाद टाळण्याच्या उद्देशाने माजी कर्णधार दिनेश चंडिमल आणि निरोशान डिक्वेला यांना विश्वचषकाच्या संघातून बाहेर ठेवण्यात आले. अशा संघाची मानसिक अवस्था काय असणार आणि ते त्यांचे हेवेदावे बाजूला ठेवून सांघिक प्रदर्शन कसे करणार? त्याबाबत वेगळे सांगायची गरज उरत नाही.

गेल्या दशकापासून श्रीलंकेच्या क्रिकेटमध्येही हेच दिसून येत आहे. त्यांचे आपापसातील वादविवाद कोणत्या स्तरावर गेले आहेत, त्याचे एक सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगा यांच्यातील वितुष्ट. परेरा हा संघातील स्थान कायम राखण्यासाठी श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांना भेटल्याचा आरोप करीत मलिंगाच्या बायकोने संघातील स्थानासाठी आपली कामगिरी उंचवावी लागते, असा टोला समाजमाध्यमांमध्ये हाणला होता. ‘फेसबुक’वरील त्या पोस्टने व्यथित आणि संतप्त झालेल्या परेराने श्रीलंका क्रिकेट मंडळाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करीत त्या मताला कठोर भाषेत प्रत्युत्तर दिले होते. संघातील दोन ज्येष्ठ खेळाडूंमध्ये जर इतके टोकाचे वाद असतील तर त्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये किती तणाव असेल आणि त्याचा परिणाम कनिष्ठ खेळाडूंवर आणि एकूणच संघावर कसा होत असेल, त्याचा अंदाज कुणीही बांधू शकतो.

त्याशिवाय सनथ जयसूर्यासारख्या श्रीलंकेच्या सर्वाधिक प्रथितयश खेळाडूवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, कथित सेक्स टेप लीक प्रकरण, त्याच्यावरील बंदी अशा सर्व बाबींचा परिणाम श्रीलंका क्रिकेटचे मनोधैर्य डळमळीत होण्यात कमीअधिक प्रमाणात निश्चितपणे झाला. विश्वविजेता कर्णधार आणि मंडळाचा प्रशासकीय प्रमुख असलेल्या अर्जुना रणतुंगाकडून संघ सट्टेबाजीत अडकल्याचे केलेले आरोप तसेच अन्य आक्षेपांमुळे श्रीलंकेचे क्रिकेट जेरीस आले आहे.

प्रशिक्षक चंडिका हथुरूसिंघा यांच्याशी झालेले माजी कर्णधार व अष्टपैलू अ‍ॅँजेलो मॅथ्यूजचे टोकाचे मतभेद या पाश्र्वभूमीवर श्रीलंका क्रिकेट मंडळाने संघ निवडीतील प्रशिक्षकांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यासारखे उचललेले पाऊल या बाबी श्रीलंका क्रिकेटमध्ये काहीच आलबेल नसल्याचेच स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळेच श्रीलंकेचा संघ २०१७ सालापासून एकही मालिका जिंकू शकलेला नाही. विश्वचषकापूर्वी मलिंगाच्या नेतृत्वाखाली सलग १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता, तर विश्वचषकापूर्वी नवा कर्णधार करुणारत्नेच्या नेतृत्वाखालीदेखील दोन सराव सामन्यांमध्ये त्यांना पराभव वाटय़ाला लागला. विश्वचषक अभियानाचा प्रारंभदेखील न्यूझीलंडकडून तब्बल १० गडी राखून पराभवाने झाला. अशा परिस्थितीत आता श्रीलंका क्रिकेटला तरण्यासाठी कोणत्या ना कोणत्या संजीवनीचीच गरज आहे. मात्र, ती क्षमता असलेला एखादा खेळाडू पुढे येऊन श्रीलंकेच्या क्रिकेटला संजीवनी देणार का? हाच खरा प्रश्न आहे.