जायंट किलर अशी ओळख मिळवलेल्या अफगाणिस्तान संघाला यंदाच्या टी-२० विश्वचषकातील प्राथमिक फेरीतून बाहेर पडावं लागलं आहे. अफगाणिस्तानने गट टप्प्यातील न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकाविरूद्धचे सुरूवातीचे दोन्ही सामने गमावल्याने संघावर स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली. दक्षिण आफ्रिकाविरूद्धचा सामना संघाने जेमतेम जिंकलाच होता, पण दोन सुपर ओव्हरमधील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये संघाने सामना गमावला. यादरम्यान संघाचे कोच जोनाथन ट्रॉट यांचा कार्यकाळ संपल्याने टी-२० विश्वचषकानंतर ते संघापासून वेगळे झाले. आता नव्या कोचची नियुक्ती करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने रिचर्ज पायबस यांची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी जोनाथन ट्रॉट यांची जागा घेतली आहे. सुरू असलेल्या पुरुष टी-२० विश्वचषकानंतर ट्रॉट यांचा कार्यकाळ संपला. पायबस यांचे पाकिस्तान क्रिकेटच्या उभारणीत मोठं योगदान दिलं आहे.

पायबस आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी व्हाईट-बॉल मालिकेपूर्वी संघासोबत जोडले जाणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या या दौऱ्याची सुरुवात १३ मार्चपासून शारजाह येथे तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होईल. त्यानंतर २० मार्चपासून दुबई येथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

पाकिस्तान क्रिकेटच्या उभारणीत पायबस यांचे योगदान

रिचर्ड पायबस यांनी १९९९ ते २००३ दरम्यान विविध टप्प्यांवर पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. १९९९ च्या क्रिकेट वर्ल्डकप दरम्यान त्यांनी सुरुवातीला सल्लागार म्हणून संघासोबत काम केलं आणि त्या स्पर्धेत पाकिस्तान अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारलं. मात्र, लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव झाला आणि ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.

पायबस यांच्या कार्यकाळात अनेक द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या; परंतु २००३ विश्वचषकात पाकिस्तानचं लवकर स्पर्धेबाहेर पडणं हे त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं कारण ठरलं. त्यांच्या काळात प्रशासकीय बदल, सुरक्षा संबंधी चिंता आणि दौऱ्यांवर परिणाम करणाऱ्या अडचणी अशा अनेक उलथापालथी घडल्या. त्या काळात पाकिस्तानचे मोजकेच परदेशी मुख्य प्रशिक्षकांपैकी एक म्हणून पायबस यांचे नाव विशेष उल्लेखनीय राहिले. याशिवाय, खेळाडू घडवण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. विशेषतः मोहम्मद रिझवानसारख्या खेळाडूंच्या विकासात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

रिचर्ड पायबस यांनी विविध जबाबदाऱ्यांमधून वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१३ मध्ये ते तीन वर्षांच्या करारावर क्रिकेट संचालक (Director of Cricket) म्हणून संघात सामील झाले. प्रादेशिक रचना मजबूत करणं आणि विकासाच्या मार्गांची उभारणी करणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी होती.

२०१८ मध्ये ते हाय परफॉर्मन्स संचालक (High Performance Director) म्हणून पुन्हा वेस्ट इंडिजसोबत जोडले गेले. या काळात त्यांनी अंडर-१९ स्तरापासून वरिष्ठ संघापर्यंत खेळाडू शोधणे आणि त्यांना घडवण्यावर विशेष भर दिला. २०१९ च्या सुरुवातीला पायबस यांनी अंतरिम मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडिजने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली, तसेच एकदिवसीय मालिका बरोबरीत राखली. मात्र, प्रशासकीय बदलांमुळे त्यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात आला. या कालावधीत त्यांनी तयार केलेल्या हाय परफॉर्मन्स रचनेचा परिपाक २०१६ मध्ये ऐतिहासिक यशाच्या रूपाने दिसून आला. २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं होतं.