Afghanistan ODI World Cup 2026 Direct Qualification: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करणाऱ्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अफगाणिस्तानने २०२७ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील सामन्यात विजय मिळवत त्यांनी पात्रता निश्चित केली. या दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना सततच्या पावसामुळे एकही चेंडू न टाकताच रद्द करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवत क्वालिफिकेशन गाठलं. यामुळे आता दोन संघांना चांगलाच फटका बसला आहे.
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने रशीद खानच्या ६ विकेट्सच्या बळावर आयर्लंडला पराभवासह दुहेरी धक्का दिला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे संघ थेट वर्ल्डकपसाठी पात्र ठरला. तर आयर्लंड संघाचं थेट पात्रता मिळवण्याचं स्वप्न भंगलं आणि त्यांना आता क्वालिफिकेशनसाठी पात्रता फेरी खेळावी लागेल.
आयसीसीच्या एकदिवसीय (ODI) संघ क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या आयर्लंडला अफगाणिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असा ‘क्लीन स्वीप’ मिळवून थेट पात्रता निश्चित करायची होती, तसेच यासाठी वेस्ट इंडिजच्या सामन्यांचे निकालही त्यांच्या बाजूने लागणं आवश्यक होतं. मात्र, पहिला सामना एकही चेंडू न टाकताच रद्द झाल्यामुळे, आयर्लंडला पात्रता मिळवणं शक्य नव्हतं. परिणामी, अफगाणिस्तानने विश्वचषकातील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
दरम्यान, मुख्य स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी आयर्लंडला आता जागतिक पात्रता स्पर्धेत झुंज द्यावी लागेल. याशिवाय वेस्ट इंडिज संघालादेखील आता आयर्लंडबरोबर पात्रता फेरीतून वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवावी लागणार आहे. एकदिवसीय (ODI) विश्वचषकासाठी थेट पात्रतेचा नियम अगदी स्पष्ट आहे. आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, स्पर्धेचं यजमानपद भूषवणारे ‘पूर्ण सदस्य’ देश (Full Member nations) आपोआप पात्र ठरतात. या आधारावर, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी २०२७ च्या विश्वचषकातील आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. यजमान देशांव्यतिरिक्त, निश्चित तारखेला (cut-off date) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल आठ संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.
आयसीसीने थेट पात्रता मिळवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. सध्याच्या मानांकनानुसार भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांनी आपली स्थानं निश्चित केली आहेत. दरम्यान, अजूनही एका संघाला थेट पात्रता मिळवता येऊ शकते आणि बांगलादेश हा त्या स्थानासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
