अफगाणिस्तानने पाकिस्तानकडून पत्करलेल्या पराभवातून सावरत रविवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात नवख्या नामिबिया संघाविरुद्ध विजयपथावर परतण्याचा निर्धार केला आहे.

स्कॉटलंडला १३० धावांनी नमवून अफगाणिस्तानने विश्वचषक अभियानाला झोकात प्रारंभ केला. पण पाकिस्तानने त्यांना पाच गडी राखून नमवले. याचप्रमाणे आम्हाला कमी लेखून चालणार नाही, असा इशाराच जणू दिला. अफगाणिस्तानकडे रशीद खान, मुजीब ऊर रेहमान आणि कर्णधार मोहम्मद नबी असे जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत.

इम्रान खान यांच्याकडून अफगाणिस्तानचे कौतुक

लाहोर : पाकिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या झुंजार खेळाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कौतुक केले. ‘‘सामना जिंकल्याबद्दल पाकिस्तान संघाचे अभिनंदन. अफगाणिस्तानच्या कामगिरीनेही प्रभावित झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या वेगाने प्रगती केलेला देश मी पाहिलेला नाही. ही जिद्द आणि प्रतिभावान खेळाडूंमुळे अफगाणिस्तानातील क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे इम्रान म्हणाले.

अफगाणिस्तानच्या चाहत्यांची चौकशी

दुबई : पाकिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमबाहेर बेशिस्त वागणूक करणाऱ्या तिकीटविना असलेल्या अफगाणिस्तानच्या चाहत्यांची चौकशी करण्याचे ‘आयसीसी’ने अमिराती क्रिकेट मंडळाला आदेश दिले आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यास हजारो अफगाण चाहत्यांनी तिकिटे नसतानाही मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला.

’  वेळ : दुपारी ३.३० वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, १ हिंदी