चौथ्या डावात ४७९ धावांचे प्रचंड लक्ष्य मिळालेल्या अफगाणिस्तानचा बांगलादेशविरुध्द पराभव अटळ होता. पण दीड दिवस १४२ षटकांचा चिवट प्रतिकार करत त्यांनी पराभवाला रोखलं.
अफगाणिस्तानने ४८९ धावांचा पाठलाग करताना चौथ्या डावात ३४६/८ अशी मजल मारली आणि सामना अनिर्णित राखला. सेदिउल्ला अटलने ३३२ चेंडूंमध्ये १११ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. कर्णधार रहमत शाहने १२४ चेंडूत ५१ तर क्वैस अहमदने ८० चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी करत पराभव टाळला.
बांगलादेशने पहिल्या डावात ३४६ धावांची मजल मारली होती. शादमन इस्लाम, तांझिड हसन आणि लिट्टन दास यांनी अर्धशतकी खेळी केल्या. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमने ४ तर यामिनझाईने ३ विकेट्स घेतल्या.
कर्णधार म्हणून पहिल्याच लढतीत रहमत शाहने नाबाद १०५ धावांची खेळी केली. अब्दुल मलिकने ६२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मात्र बाकी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. बांगलादेशकडून हसन महमूदने हॅट्रिटकसह ५ विकेट्स घेतल्या. इबादत होसेनने ४ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. बांगलादेशने १०६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
बांगलादेशने दुसरा डाव ३७२ धावांवर घोषित केला. लिट्टन दासने आक्रमक शतकी खेळी साकारली. नजमुल हसन शंटोने ८२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. बांगलादेशने अफगाणिस्तानला ४७९ धावांचं प्रचंड लक्ष्य दिलं. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अफगाणिस्तानचा संघ झटपट गाशा गुंडाळेल असं स्थिती होती पण त्यांनी चिवट झुंज दिली.
सेदिउल्ला अटल हा चौथ्या डावात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला. कर्णधार रहमत शाहने पहिल्या डावातील फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावलं. १४२ षटकं खेळून काढत अफगाणिस्तानने अटळ वाटणारा पराभव थोपवला. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराझ आणि इबादत होसेन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. या एकमेव कसोटीनंतर युएई, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात तिरंगी वनडे मालिका होणार आहे.
