अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वांत युवा कर्णधार झाला आहे. राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस आहे. असगर स्टॅनिकजईऐवजी राशिद खानकडे नेतृत्व दिले आहे. असगरला अपेंडिक्सवरील शस्त्रक्रियेसाठी सध्या झिम्बाब्वेतील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफगाणिस्तानने झिम्बाब्वेविरूद्धच्या टी-२० मलिकेत २-० ने विजय मिळवला आहे. या विजयी संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकताच आयसीसीच्या टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. यापूर्वी राशिदने एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहबरोबर संयुक्त स्थान प्राप्त केले होते.

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळल्या गेलेल्या तीन टी-२० सामन्यात शानदार कामगिरी करत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने २० स्थानांनी प्रगती करत १२ व्या क्रमांकावर उडी मारली. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहची क्रमवारीत घसरण झाली असून तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोढी दुसऱ्या, वेस्ट इंडीजचा सॅम्युएल बद्री तिसऱ्या तर पाकिस्तानचा इमाद वसीम चौथ्या स्थानी आहे.

क्रिकेट इतिहासातील सर्वांत युवा कर्णधार:

राशिद खान (अफगानिस्तान) – १९ वर्षे १५९ दिवस

रोडनी ट्रॉट (बर्मुडा) – २० वर्षे ३३२ दिवस

राजिन सलेह (बांगलादेश) – २० वर्षे २९७ दिवस

तेतेंदा तैबू (झिम्बाब्वे) – २० वर्षे ३४२ दिवस

नवाब पतोडी (भारत) – २१ वर्षे ७७ दिवस

राशिद खानने ३७ एकदिवसीय सामन्यातील ३५ डावांमध्ये ३.८२ च्या इकॉनामीने ८६ विकेट मिळवल्या आहेत. १८ धावांच्या बदल्यात ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. तर टी-२०च्या २९ सामन्यात त्याने ४७ विकेट टिपल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने एका डावात ३ धावा देऊन ५ विकेट घेण्याचा कारनामा केलेला आहे. राशिद आयपीएल १० मध्येही चमकला होता.