वृत्तसंस्था, नवी दिल्ली

महिलांच्या श्रेणीत केवळ जैविक महिलाच स्पर्धा करतील, याची खात्री करण्यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (एएफआय) पुढील महिन्यात रांची येथे होणार्‍या फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेपासून खेळाडूंची जनुकीय (डीएनए) आणि लिंगचाचणी (एसआरवाय) घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही चाचण्यांचे निकाल आणि सर्व तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

‘एसआरवाय’ चाचणी ही एक निरंतर प्रक्रिया आहे. जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची शक्यता आहे, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया गेल्या वर्षापासूनच सुरू झाली आहे. ही चाचणी खेळाडूला फक्त एकदाच करावी लागेल. या चाचणीचे अहवाल जागतिक ॲथलेटिक्स संघटनेच्या संकेतस्थळावर नोंदले गेले की, ते नष्ट केले जातील. त्यामुळे गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे ‘एएफआय’चे प्रवक्ते आदिल सुमारीवाला यांनी शनिवारी एका आभासी पत्रकार परिषदेत सांगितले. 

जागतिक ॲथलेटिक्सच्या सूचनेनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टोक्यो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला खेळाडूंसाठी भारतात ‘एसआरवाय’ चाचणी सुरू करण्यात आली होती. ‘एएफआय’ने १३ ऑगस्ट रोजी आपल्या सर्व संलग्न घटकांना यासंदर्भात नोटीस देखील पाठवली होती.

ही चाचणी काहीशी खर्चिक असून एका चाचणीसाठी साधारण ८,००० रुपये खर्च येतो. मात्र, ‘एएफआय’ने जागतिक ॲथलेटिक्स संघटनेच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेशी बोलणी करून हा खर्च प्रति चाचणी ३,५०० रुपयांपर्यंत कमी केला आहे. याचा खर्च ‘एएफआय’ थेट प्रयोगशाळेला देणार आहे.

‘‘भारतीय खेळाडूंची कोणत्याही प्रकारे ‘डीएनए’ माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्याची तयारी करण्यासाठी आपल्याला संशोधनात उतरावे लागेल. या चाचण्या गुणवत्ता शोधण्यासाठी नसून माहिती गोळा करण्यासाठी आहेत. या माहितीचा वापर करून आम्ही खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम राबवू शकू,’’ असे सुमारीवाला म्हणाले.

उद्देश काय?

‘डीएनए’ चाचणीमुळे खेळाडूच्या शरीराची आणि स्नायूंची रचना समजण्यास मदत होईल. एखादी दुखापत झाल्यास ती किती लवकर बरी होऊ शकते, हे शोधण्यासाठी देखील याचा वापर होईल. तसेच ‘एसआरवाय’ चाचणीचा उपयोग ॲथलेटिक्समध्ये होणारी तोतयागिरी रोखण्यासाठी होईल. या चाचण्यांसाठी सर्व खर्च महासंघ करणार आहे.

देशातील ९० टक्के सिंथेटिक ट्रॅक निकृष्ट दर्जाचे -सुमारीवाला

भारतात सध्या वापरात असलेले ९० टक्क्यांहून अधिक सिंथेटिक ट्रॅक हे साहित्य, बांधणी आणि आखणी या तिन्ही बाबतीत निकृष्ट दर्जाचे असल्याचा धक्कादायक खुलासा भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे प्रवक्ते आदिल सुमारीवाला यांनी शनिवारी केला. ‘‘मी विशिष्ट ट्रॅकची नावे घेणार नाही, पण देशातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त ट्रॅक निकृष्ट दर्जाचे आहेत. गेल्या वर्षी टोक्यो येथील जागतिक स्पर्धेदरम्यान जागतिक ॲथलेटिक्स संघटनेसह आमची बैठक झाली, तेव्हा त्यांनी आम्हाला काही आकडेवारी दाखवली, जी अत्यंत धक्कादायक होती,’’ असे सुमारीवाला म्हणाले.  ‘‘काही ठिकाणी पॉलीयूरेथेनऐवजी फक्त रबर किंवा टायरचे रबर वापरले जात आहे. आम्ही असेही ट्रॅक पाहिले आहेत जिथे खाली टायरचे रबर टाकून वरून फक्त लाल रंग दिला आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.