ऑलिम्पिक आयोजनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजकांना इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने वास्तवाने दणका दिला. बॅडमिंटन विश्वातल्या प्रतिष्ठेच्या इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर ७५० स्पर्धेवेळी प्रेक्षकांमध्ये एक माकड बसल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच स्टेडियममध्ये पक्ष्यांनी केलेल्या घाणीबाबत विदेशी खेळाडूंनी तक्रार केली होती. तो विषय मार्गी लागण्याआधीच माकड थेट प्रेक्षागृहात दाखल झाल्याने जोरदार टीका होत आहे.

राजधानीत दिल्लीत कडाक्याच्या थंडीत इंदिरा गांधी क्रीडा संकुलात इंडिया ओपन बॅडमिंटन ही स्पर्धा सुरू आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. छायाचित्रकार अझल्याना देवी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तीन पोस्टमध्ये प्रेक्षकांमध्ये माकड येऊन बसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला तोंड फुटलं. देशविदेशातले मोठे खेळाडू खेळत आहेत त्या कोर्टपासून अवघ्या काही फुटांवर माकड येऊन बसल्याने संयोजकांवर कडाडून टीका होत आहे. दरम्यान स्पर्धेसाठी तैनात सुरक्षा यंत्रणांनी माकड स्टेडियममध्ये आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

प्रेक्षागृहात एक माकड आलं होतं. गोल्ड स्टँडमध्ये ते साधारण १० मिनिटं बसलं होतं. आम्हाला यासंदर्भात तक्रार मिळाली. आम्ही तातडीने कार्यवाही करून माकडाला बाहेर काढलं असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. माकडाने कोणाला काहीही त्रास दिला नाही. प्रेक्षागृहाचा तो भाग अंधारमय असल्याने माकड आल्याचं चटकन कळलं नाही. जेव्हा माकड आल्याचं कळलं, आम्ही तातडीने कार्यवाही केली असं अधिकाऱ्याने सांगितलं.

कोरियाचा दुहेरीतील खेळाडू कांग मिन ह्युकने पोस्ट केलेल्या व्हीडिओत, खाशाबा जाधव इन्डोअर हॉलमध्येही एक माकड असल्याचं दिसून आलं. प्राण्यांना मुक्त प्रवेश आहे का? अशा कॅप्शनसह त्याने फोटो शेअर केला होता.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी डेन्मार्कची खेळाडू मिआ ब्लिचफेल्डटने सराव केंद्राच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. सराव केंद्रात कबुतरं आहेत. बऱ्याच ठिकाणी प्राण्यांनी घाण करून ठेवली आहे असं तिने म्हटलं होतं. कोर्ट्स उत्तम आहेत पण आरोग्य नीट नाही असं लिहित तिने पोस्ट शेअर केली होती. फ्लोअरिंगवर धूळ आहे. कोर्टवरही आहे. सराव केंद्रात पक्षी घिरट्या घालत होते. त्यांनी बरीच घाणही करून ठेवली आहे.

खेळाडूंच्या तक्रारीनंतर जागतिक बॅडमिंटन संघटनेला याची दखल घ्यावी लागली. स्टेडियम, सराव केंद्र याकडे आम्ही सातत्याने लक्ष ठेऊन आहोत. खेळाडूंचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे असं संघटनेनं म्हटलं आहे. इंदिरा गांधी क्रीडा संकुलातच आणखी काही महिन्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.

‘खेळाडूंनी ठिकाणासंदर्भात केलेल्या तक्रारांची आम्ही दखल घेतली आहे. आम्ही योग्य ती काळजी घेऊ’, असं जागतिक बॅडमिंटन संघटनेनं म्हटलं आहे.

‘इंदिरा गांधी क्रीडा संकुलात खेळाडूंना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. खेळाडूंचं म्हणणं आम्ही समजून घेऊ. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवेळी कोणतीही उणीव राहणार नाही’, असं संघटनेनं पुढे म्हटलं आहे.

दरम्यान डेन्मार्कच्या खेळाडूने केलेली पोस्ट खाशाबा जाधव स्टेडियमबाबत होती. ते सराव केंद्र आहे, स्पर्धा वेगळ्या ठिकाणी म्हणजे इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरू आहे असं भारतीय बॅडमिंटन संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्लिचफेल्ड्टने सलग दुसऱ्या वर्षी खराब स्थितीबाबत तक्रार केली आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेला आंद्रे अँटोनसन हा स्पर्धेसाठी दिल्लीत नाहीये. एअर क्वालिटी इंडेक्स समाधानकारक नसल्याने अँटोनसनने इंडिया ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी माघार का घेतली याबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती भीषण अशी आहे. बॅडमिंटन स्पर्धा इथे होऊ शकत नाही.