वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

कडव्या प्रतिकारानंतर महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरीत सेनादलाकडून ३८-४० असा निसटता पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पुरुषांच्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले. पण प्रशिक्षक प्रशांत सुर्वे व शुभम शिंदेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या कामगिरीने कबड्डी रसिकांची मने जिंकली.

अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात सेनादलाने पहिल्यापासून वर्चस्व ठेवले होते. पूर्वार्धात महाराष्ट्रावर पहिला लोण देत मध्यांतराला २२-१७ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राचा संघ वेगळ्या इराद्याने मैदानात उतरला. सिद्धार्थ देसाई, पंकज मोहिते, रिशांक देवाडिगा यांनी चढाईत गुण घेतले, तर मयूर कदम, गिरीश इरनाक, शुभम यांनी उत्कृष्ट पकडी करीत सेनादलावर लोण देत गुणफरक कमी केला. शेवटची काही मिनिटे सेनादल फक्त एक गुणाच्या आघाडीवर खेळत होता.

पहिल्या डावात महाराष्ट्राच्या तीन चढाईपटूंच्या अव्वल पकडी झाल्या. महाराष्ट्राच्या क्षेत्ररक्षकांनीही एक अव्वल पकड केली. शेवटच्या मिनिटांत सिद्धार्थची झालेली पकड सेनादलासाठी निर्णायक ठरली.

सेनादलाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या चढाईपटूंनी अप्रतिम कामगिरी बजावली, परंतु उत्तरार्धात बचावात कमी पडल्याने सामना फक्त दोन गुणांनी गमावला. या पकडी झाल्या असत्या तर सामन्याचे चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. पण साखळीतील वर्चस्वपूर्ण कामगिरीनंतर उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेश आणि उपांत्य सामन्यात सेनादलाविरुद्ध खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. कोणत्याही संघाविरुद्ध आम्ही सहज पराभव पत्करला नाही.

-प्रशांत सुर्वे, महाराष्ट्राचे प्रशिक्षक

रेल्वेची जेतेपदाची हॅट्ट्रिक

भारतीय रेल्वेने सेनादलाला ४४-२३ असे सहज पराभूत करीत राष्ट्रीय विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. रोहा (महाराष्ट्रात), जयपूर (राजस्थान) नंतर अयोध्येत सेनादलानेही सलग तिसऱ्यांदा जेतेपदावर समाधान मानले. पहिल्या सत्रात रेल्वेकडे १९-१० अशी आघाडी होती. या एकतर्फी सामन्यात रेल्वेचा पवनकुमार विरुद्ध सेनादलाचा नवीन कुमार यांच्यातच प्रामुख्याने लढत झाली.