Ravindra Jadeja Retirement: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा सामना जिंकून इंग्लंडने वनडे मालिकेत १-१ ने पुनरागमन केलं आहे. हा सामना इंग्लंडने जिंकला, पण इंग्लंडच्या विजयाहून जास्त चर्चा रंगली ती रोहित शर्माच्या निवृत्तीची. रोहित शर्मा हा वनडे वर्ल्डकप २०२७ सेटअपचा भाग नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा तिसरा वनडे सामना हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. पण रोहितसह आणखी एक स्टार खेळाडू आहे, जो लवकरच निवृत्तीची घोषणा करु शकतो.

द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारताला टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा रवींद्र जडेजाचा वनडे क्रिकेटमधील प्रवास लवकरच संपू शकतो. यामागचं सर्वात मोठं कारण, अक्षर पटेल आहे. डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज, फलंदाजीत दमदार कामगिरी करत असलेला अक्षर हा रवींद्र जडेजाची जागा घेण्यासाठी योग्य पर्याय आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. या कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. या सामन्यात त्याने फलंदाजीत आणि गोलंदाजीत मोलाचं योगदान दिलं होतं.

रवींद्र जडेजाला गेल्या काही मालिकांसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. माध्यमातील वृत्तानुसार, जडेजाच्या गोलंदाजीत तितकी धार राहिलेली नाही. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत स्थान देण्यामागचं कारण म्हणजे, दुबईतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी फायदेशीर ठरते. यासह तो मोठे फटके खेळण्यासाठी आणि आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जायचा. २०१९ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान त्याने दमदार फलंदाजी केली होती. पण रोहितप्रमाणेच जडेजा देखील २०२७ वर्ल्डकप सेटअपचा भाग नसल्याची माहिती समोर येत आहे.

जडेजा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जायचा. तो गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मोलाचं योगदान द्यायचा. जर आकडेवारी पाहिली, तर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत तो नावाला साजेशी कामगिरी करु शकला नव्हता. फलंदाजी करताना तो अवघ्या ४३ धावा करु शकला होता. यादरम्यान त्याने अवघ्या १४.३३ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. जडेजाने २०२४ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये जडेजाची जागा घेण्यासाठी अक्षर पटेल तयार झाला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये मानव सुथारला संधी दिली गेली आहे. जडेजासारखीच फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची शैली असलेल्या मानव सुथारने अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे जडेजाला आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही.