ऑस्ट्रेलियन संघाने २० सप्टेंबरपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी मोहालीमध्ये सराव सुरू केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या दौऱ्यात अनुभवी डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिली असून कॅमरून ग्रीन त्याच्या जागी खेळणार आहे. पाहुण्या संघाने भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी सरावाला देखील सुरुवात केली आहे. सोशल मीडिया एक खास व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामधून संघाच्या सरावाला सुरुवात झाल्याचे समजते. मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस दुखापतींमुळे दौऱ्यातून बाहेर आहेत. पाहुण्या संघाला पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी त्यांच्या तयारीची चाचणी घेण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ सहा वर्षांनंतर टी२० सामने खेळण्यासाठी मोहालीत येणार आहे. त्याने २७ मार्च २०१६ रोजी विश्वचषक टी२० मध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता ज्यात त्यांना सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी२० सामना मोहालीमध्ये खेळला जाणार असून पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्याआधी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सामान आणि ड्रेसिंग रूममधील काही दृश्य दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मोहालीतील परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेसाठी तयार असला, तरी त्यांच्यासाठी भारताचे आव्हान सोपे नसेल.

ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण दोन टी२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी मार्च २०१६ मध्ये पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव केला होता. भारताने या मैदानावर तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि सर्वांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला आहे. त्यांनी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला आठ सामने खेळायचे आहेत. भारतानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे.

हेही वाचा   :  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी भारताला मोठा धक्का; कोविड संसर्गामुळे महत्त्वाचा खेळाडू बाहेर 

कोरोनाची लागण झाल्यामुळे मोहम्मद शमीला माघार घ्यावी लागली असली तरी दुसरीकडे भारतीय संघ मात्र त्याच्या सर्वोत्तम संघासह ही मालिका खेळेल. भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंना मागच्या काही महितन्यांमध्ये विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे सर्वोत्तम अकरा खेळाडूंना निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध असतील. मालिकेतील पहिला सामना २० सप्टेंबरला, तर दुसरा सामना २३ सप्टेंबर रोजी नागपुरमध्ये खेळला जाईल. तिसरा आणि शेवटचा सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल.