Rahul Dravid Welcome to Bangalore Cricket Academy : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे बंगळुरू येथील क्रिकेट अकादमीत स्वागत करण्यात आले. द्रविडच्या सन्मानार्थ स्थानिक युवा खेळाडूंनी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. अलीकडेच द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ११ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. मात्र, मुख्य प्रशिक्षकपदाचा द्रविडचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासह संपुष्टात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल द्रविड जेव्हा बंगळुरू क्रिकेट अकादमीत पोहोचले, तेव्हा नवोदित खेळाडूंनी त्यांच्या सन्मानार्थ बॅट उंचावल्या आणि ॲकॅडमीच्या कोचिंग स्टाफने द्रविड यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. द्रविड यांनी पण तेथे उपस्थित लोकांना अभिवादन केले आणि हसून सर्वांशी हस्तांदोलन केले. द्रविड यांनी १९९६ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते आणि २०१२ पर्यंत देशाचे प्रतिनिधित्व करत राहिले. इतर सर्वांप्रमाणे द्रविड यांचेही विश्वविजेते बनण्याचे स्वप्न होते. मात्र, प्रशिक्षक म्हणून ते हे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरले.

राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघ २००७ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता, परंतु संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि भारताचा प्रवास गट टप्प्यातच संपुष्टात आला. राहुल द्रविड २०२१ मध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक बनले आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली संघाने २०२२ टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी, २०२३ विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आणि २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा – MLC 2024: विराटनंतर रसेलनेही हरिस रौफला दाखवले तारे, ३५१ फूट उंच मारलेल्या षटकाराचा VIDEO व्हायरल

या तिन्ही वेळी भारतीय संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र कार्यकाळातील शेवटच्या स्पर्धेत संघाला विश्वविजेते बनवण्यात द्रविड यांना यश आले. राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालीच संघाने गतवर्षी श्रीलंकेचा पराभव करून आशिया चषक जिंकला होता. बंगळुरूमधील स्थानिक क्रिकेट अकादमीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविडने मैदानावर परत आल्याबद्दल आणि उदयोन्मुख प्रतिभांना तयार केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After team india won t20 wc 2024 rahul dravid receives guard of honour from children at bengaluru academy video vbm