२०१९ साली पाकिस्तानला भारताकडून हार पत्करावी लागली. यानंतर एका व्हिडीओमधून व्हायरल झालेला, ‘मारो मुझे मारो’ म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी तुम्हाला आठवतोय का? मोमीन साकिब या क्रिकेटप्रेमीने २८ ऑगस्टला दुबईमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक २०२२च्या सामान्यालाही उपस्थिती दर्शवली. तथापि, पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर मोमीन फारच निराश झाला. सामन्यानंतर त्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना भेटण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आशिया कप २०२२ च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांच्या अष्टपैलू खेळीमुळे भारताचा विजय निश्चित झाला. भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. यामध्ये हार्दिक पंड्याचा हातभार मोठा होता. हार्दिकने १७ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या आणि ३ विकेट घेतले. तर विराट कोहलीने ३४ चेंडूत ३५ धावा केल्या.

India Beats Pakistan: भारताच्या विजयानंतर शाहीद आफ्रिदी हार्दिक पंड्याच्या खेळीवर फिदा; म्हणाला, “पंड्याने दोन्ही…”

सामन्यानंतर मोमीनने पांड्या आणि कोहली या दोघांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्याने विराट कोहली सोबतच व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले, “एक महान खेळाडू आणि नम्र व्यक्तिमत्व. तुम्हाला परत फॉर्ममध्ये पाहून आनंद झाला. फायनलमध्ये नक्की भेटू!”

“चांगला अटीतटीचा खेळ. तरुण आणि कमी अनुभव असूनही आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पण तू चांगली फलंदाजी करून सामना आमच्यापासून दूर नेला. भाई तेरा छक्का नही भूलेगा!” त्याने पंड्यासोबत व्हिडीओ शेअर करत लिहिले.

मोमीन साकिबचा ‘मारो मुझे मारो’ हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. यावर अनेक मीम्सही बनवण्यात आले होते. आजही त्याची ही वाक्ये प्रसिद्ध आहेत.