Who are those four who lift the trophy of Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका बुधलारी पार पडली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. मात्र, संघाने याआधीच पहिले दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला होता. पहिल्या दोन सामन्यात केएल राहुलने भारतीय संघाची कमान सांभाळली होती. रोहित शर्मा आणि वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मालिका विजयानंतर टीम इंडियाने ट्रॉफीसह सेलिब्रेशन केले. मात्र, टीम इंडियाची ट्रॉफी उंचावणारे अनोळखी चार चेहरे कोण होते? जाणून घेऊया.
कोण होते ते चौघे?
तिसऱ्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी केएल राहुलला ट्रॉफी दिली. यानंतर राहुलने ही ट्रॉफी चाहत्यांसाठी अनोळखी असलेल्या चार स्थानिक खेळाडूंच्या हातात दिली. हे चौघे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. खरे तर ते दुसरे कोणी नसून सौराष्ट्रकडून क्रिकेट खेळणारे धर्मेंद्र सिंग जडेजा, पारीक मंकंद, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई हे होते.




वास्तविक तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाकडे केवळ १३ खेळाडू होते. अशा परिस्थितीत रमेंद्रसिंग जडेजा, पारीक मंकंद, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई यांनी सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंना मदत केली. या खेळाडूंनी सामन्यादरम्यान टीम इंडियालाड्रिंक्स देण्यातही मदत केली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणातही सहकार्य केले.
सामन्यापूर्वी रोहित शर्माने स्पष्ट केले होते की, त्यांच्या संघात केवळ १३ खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंना व्हायरल ताप आला होता आणि विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. रोहित म्हणाला होता, ‘आमचे अनेक खेळाडू आजारी आहेत आणि उपलब्ध नाहीत. तसेच वैयक्तिक कारणांमुळे अनेक खेळाडू घरी गेले आहेत. या सामन्यात आमचे एकूण १३ खेळाडू आहेत.’
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही –
सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज बाद होणारा संघाचा शेवटचा फलंदाज होता. ५० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमरून ग्रीनकरवी त्याला कर्णधार पॅट कमिन्सने झेलबाद केले. सिराजने आठ चेंडूत एक धाव काढली. प्रसिद्ध कृष्णा खातेही न उघडता नाबाद राहिला.
हेही वाचा – शिखर धवनने चेतेश्वर पुजाराची घेतली मजा! इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या ‘VIDEO’वर केली मजेशीर कमेंट
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. विराट कोहलीने ५६ धावांची आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी खेळली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. रवींद्र जडेजाने ३५ आणि केएल राहुलने २६ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आणि 18 धावा करून बाद झाला.