सिद्धेश लाडची अप्रतिम खेळी; शार्दूल, शिवमच्या गोलंदाजीपुढे उत्तर प्रदेशची वाताहत

सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळी फेरीत मुंबईची धडाकेबाज कामगिरी सुरूच असून मंगळवारी सकाळी रंगलेल्या सामन्यात मुंबईने उत्तर प्रदेशचा ४६ धावांनी धुव्वा उडवला. सिद्धेश लाडची अष्टपैलू कामगिरी मुंबईच्या विजयात मोलाची ठरली.

मुंबईने अव्वल साखळी फेरीत तिसऱ्या विजयाची नोंद केली असली तरी त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. मुंबईने १२ गुणांसह ब गटात दुसरे स्थान पटकावले असून बलाढय़ कर्नाटकने चारही सामने जिंकून १६ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यामुळे ब गटातून कर्नाटक अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. गुरुवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत कर्नाटकला महाराष्ट्राशी दोन हात करावे लागतील.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईला पहिल्याच चेंडूवर पहिला हादरा बसला. गेल्या सामन्यातील सामनावीर जय बिश्त याला अंकित राजपूतने खातेही खोलण्याची संधी दिली नाही. शून्यावरच पहिला गडी गमावल्यानंतर एकनाथ केरकर आणि सिद्धेश लाड यांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत मुंबईला १ बाद ९६ अशा मजबूत स्थितीत आणले. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात केरकरची खेळी संपुष्टात आली. त्याने ३६ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकारासह ४६ धावा फटकावल्या.

सिद्धेशने मोठी फटकेबाजी करताना उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने ४४ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी करत सर्वाधिक ६६ धावा फटकावल्या. तो बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने नेहमीप्रमाणेच आपल्या शैलीत तुफानी फटकेबाजी केली. त्याने २३ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकारासह ४३ धावांचे योगदान दिले. अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर बाद होऊन तो माघारी परतला तेव्हा मुंबईने १७५ धावांचा टप्पा पार केला होता. उत्तर प्रदेशकडून कर्णधार अंकित राजपूतने तीन बळी मिळवले.

मुंबईचे आव्हान पार करताना उत्तर प्रदेशची सुरुवातच निराशाजनक झाली. शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी उत्तर प्रदेशला एकापाठोपाठ हादरे देत त्यांच्या डावाला सुरुंग लावला. त्यांच्या आघाडीच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे सहाव्या षटकांत त्यांची ४ बाद २४ अशी बिकट अवस्था झाली होती. प्रियम गर्ग आणि रिंकू सिंग यांनी काहीअंशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण गर्ग (२३) आणि सिंग (१९) बाद झाल्यानंतर उत्तर प्रदेशचा पराभव निश्चित झाला होता. सौरभ कुमार (२४) याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. पण सिद्धेश लाडने त्यांचे शेवटचे तीन फलंदाज बाद करत उत्तर प्रदेशचा डाव १९ षटकांत १३७ धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून शार्दूल, शिवम आणि सिद्धेश यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : २० षटकांत ७ बाद १८३ (सिद्धेश लाड ६२, एकनाथ केरकर ४६, श्रेयस अय्यर ४३; अंकित राजपूत ३/४७) विजयी वि. उत्तर प्रदेश : १९ षटकांत सर्व बाद १३७ (सौरभ कुमार २४, प्रियम गर्ग २३, रिंकू सिंग १९; शार्दूल ठाकूर ३/१५, सिद्धेश लाड ३/२३, शिवम दुबे ३/३१).

सामनावीर : सिद्धेश लाड