सरचिटणीस व्हॅलके निलंबित
विश्वचषक तिकीट घोटाळ्याचा ठपका

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) पुन्हा एकदा भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात ओढला गेला आहे. फिफाचे सरचिटणीस जेरॉम व्हॅलके यांच्यावर विश्वचषक स्पध्रेच्या तिकीट घोटाळ्यात सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. फिफाचे विद्यमान अध्यक्ष सेप ब्लाटर यांचे निकवर्तीय म्हणून व्हॅलके ओळखले जातात.
‘‘व्हॅलके यांना सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे आणि पुढील नोटीस मिळेपर्यंत त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. सरचिटणीसांवर वारंवार आरोप होत आहेत आणि या प्रकरणाचा तपास फिफाच्या शिस्तपालन समितीला करण्याची विनंती केली आहे, ’’ अशी माहिती फिफाच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
व्हॅलके यांच्यावर यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला दहा दशलक्ष डॉलर देण्याच्या आरोपामध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. व्हॅलके यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
२०१४च्या विश्वचषक स्पध्रेच्या तिकिटांच्या विक्रीत अफरातफर केल्याचा दावा अमेरिकन-इस्राईल सल्लागार बेनी अॅलोन यांनी केला आहे. या विश्वचषक स्पध्रेकरिता सुरुवातीला अॅलोन यांच्या कंपनीला तिकिटाचे करार देण्यात आले होते, परंतु फिफाने ते रद्द केले.