Abhishek Sharma Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेत अभिषेक शर्माला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण पंजाब किंग्ज संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने १८ चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. तर २६ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरनचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

अभिषेक शर्माने ७४ धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याने २६४.२९ च्या स्ट्राईक रेटने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याचं पाचवं असं अर्धशतक ठरलं, जे त्याने २५० किंवा त्याहून अधिकच्या स्ट्राईक रेटने पूर्ण केलं. या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी पोहोचाआहे. याआधी कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांनी फलंदाजी करताना संयुक्तरित्या ४-४ वेळा अर्धशतकं झळकावली होती.

आयपीएल स्पर्धेत २५० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे फलंदाज

अभिषेक शर्मा- ५ वेळा
कायरन पोलार्ड- ४ वेळा
निकोलस पूरन- ४ वेळा
वैभव सूर्यवंशी- ३ वेळा
जॅक फ्रेजर मॅकगर्क- ३ वेळा
ट्रॅव्हिस हेड- ३ वेळा

यासह अभिषेक शर्माच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस एकाच डावात ६ किंवा त्याहून अधिक षटकार मारणाऱ्या रेकॉर्डमध्ये त्याने संजू सॅमसनची बरोबरी केली आहे. आता दोघेही या रेकॉर्डमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहेत. अभिषेक आणि संजू या दोन्ही फलंदाजांनी ८-८ वेळेस हा कारनामा केला आहे. या यादीत ऋषभ पंत दुसऱ्या स्थानी आहे. ऋषभ पंतने ७ वेळेस असा कारनामा केला आहे.

पंजाबचा विजय

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ६ गडी बाद २१९ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने ७४ धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ३९ आणि ट्रॅव्हिस हेडने ३८ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ६९ धावांची खेळी केली. तर प्रियांश आर्यने ५७ धावा केल्या आणि प्रभसिमरन सिंगने ५१ धावा केल्या. यासह पंजाबने हे आव्हान १८.५ षटकात पूर्ण करत विजयाची हॅट्रिक केली.