Aiden Markram Record In Icc T20 World Cup: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यावेळी दक्षिण आफ्रिकेला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. एडन मारक्रमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा साखळी फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध पार पडला. या सामन्यातही विजयाची नोंद करत दक्षिण आफ्रिकेचा संघ अजिंक्य राहिला. दरम्यान हा सामना जिंकताच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या मोठ्या विक्रमात केन विलियम्सनला टाकलं मागे

कर्णधार आणि फलंदाज म्हणून एडन मारक्रम सुपरहिट ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार विजयाची नोंद केली. हा सामना जिंकताच एडन मारक्रमने मोठया विक्रमात केन विलियम्सनला मागे टाकलं आहे. एडन मारक्रम हा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

एडन मारक्रमच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत १६ सामने खेळले आहेत. त्यापैकी १५ सामने जिंकले आहेत. यादरम्यान केवळ १ सामना गमावला आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत अव्वल स्थानी आहे. टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३३ सामने खेळले यापैकी २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

टी – २० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार

एमएस धोनी (भारत) – २१ विजय (३३ सामने
)
एडन मारक्रम (दक्षिण आफ्रिका) – १५ विजय (१६ सामने)

केन विलियम्सन (न्यूझीलंड) – १४ विजय (२१ सामने)

रोहित शर्मा (भारत) – १२ विजय (१४ सामने)

डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज) – १२ विजय (१८ सामने)

दासून शनाका (श्रीलंका) – १२ विजय (२३ सामने)

दक्षिण आफ्रिकेचा विजय

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ७ गडी बाद १५३ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक ७३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने दिलेलं आव्हान १७.५ षटकात पूर्ण केलं आणि विजय मिळवला.