Aiden Markram World Record in Test: दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा घरच्या मैदानावर एकतर्फी पराभव करत २-०च्या फरकाने मालिका जिंकली आहे. भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे घरच्या मैदानावर पुन्हा एकदा व्हाईटवॉशला सामोर जावं लागलं आहे. गुवाहाटी कसोटी सामन्यात द. आफ्रिका संघाने भारताचा ४०८ धावांनी सर्वात मोठा पराभव केला आहे. आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. यादरम्यान एडन मारक्रमने मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

तब्बल २५ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे. कसोटी मालिकेत भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. रवींद्र जडेजा वगळता दुसऱ्या कसोटीत कोणताच फलंदाज ३० धावांचा पल्लाही गाठू शकला नाही. तर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेकडून सेनुरन मुथुसॅमीने पहिलं कसोटी शतक झळकावलं. तर गोलंदाज मार्काे यान्सनने ९४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर यान्सनने गोलंदाजीत पहिल्या डावात ६ विकेट्स घेतल्या, तर सायमन हार्मरने दुसऱ्या ६ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत मोठी कामगिरी केली नसली तरी मारक्रमने फिल्डिंगमध्ये विश्वविक्रम रचला आहे.

एडन मारक्रमचं यान्सन व हार्मरच्या विकेट्समध्ये सर्वात मोठं योगदान आहे. स्लिपमध्ये मारक्रमने एकापेक्षा एक उत्कृष्ट झेल टिपले आहेत. मारक्रमने या सामन्यात सर्वाधिक ९ झेल घेतले आहेत. यासह एका कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षकाने सर्वाधिक झेल टिपणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे, यासह मारक्रमने अजिंक्य रहाणेला मागे टाकत हा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. अजिंक्य रहाणेने २०१५ मध्ये गॅलेमध्ये झालेल्या श्रीलंकेविरूद्ध कसोटीत सर्वाधिक ८ झेल टिपले होते. आता मारक्रमने सर्वाधिक ९ झेल घेत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.