ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे लक्ष्य! ; अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलची भावना

‘‘पदक जिंकणे आणि स्वत:च्या खेळात सुधारणा करणे, हे कायमच माझे लक्ष्य असते. मी पुढील केवळ दोन वर्षांचा विचार करत आहे.

ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे लक्ष्य! ; अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलची भावना
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे आपले लक्ष्य असल्याची भावना भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने व्यक्त केली.

नुकत्याच बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कमलने एकूण चार पदकांची कमाई केली. मिश्र दुहेरीत सुवर्ण कामगिरी करण्यासह त्याने १६ वर्षांनी एकेरीत सुवर्णपदक जिंकले. सर्वोच्च स्तरावर तब्बल २० वर्षे देशाचे प्रतिनिधित्व केले असले, तरी कमलने अद्याप निवृत्तीचा विचार केलेला नाही. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकता यावे म्हणून तो आणखी दोन वर्षे मेहनत घेणार आहे.

‘‘राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केल्याने मी आनंदी आहे. यापूर्वी एका राष्ट्रकुल स्पर्धेत तीन पदके जिंकणे, ही माझी सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र, यंदा मी चार पदके जिंकू शकलो, याचे समाधान आहे. खेळाडूसाठी तंदुरुस्ती महत्त्वाची असून माझा नेहमीच त्यावर भर असतो. युवा खेळाडूंविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करता यावी यासाठी मी स्वत:च्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतो,’’ असे ४० वर्षीय शरथने सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेत शरथने आजवर एकूण १३ पदके मिळवली आहेत. तसेच २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने दोन कांस्यपदके जिंकली होती.

‘‘पदक जिंकणे आणि स्वत:च्या खेळात सुधारणा करणे, हे कायमच माझे लक्ष्य असते. मी पुढील केवळ दोन वर्षांचा विचार करत आहे. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सांघिक गटात पात्रता मिळवण्याची आम्हाला आशा आहे. आमचा तिथे पदक जिंकण्याचा प्रयत्न असेल,’’असे शरथ म्हणाला. ‘‘भारतीय टेबल टेनिसपटूंच्या सातत्याने प्रगतीची सुरुवात ही राष्ट्रकुल स्पर्धेपासून झाली. यानंतर आशियाई स्तरावर आम्ही स्थिरावलो आणि आता ऑलिम्पिकमध्ये पदक हे आमचे पुढील लक्ष्य आहे,’’ असेही शरथ म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
इंग्लंडच्या संघाला मिळाले खुर्च्या उचलण्याचे काम! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
फोटो गॅलरी