एअर इंडिया, महाराष्ट्र पोलीस बाद फेरीत

ड-गटात महाराष्ट्र पोलीस संघाने  मुंबई बंदराला ३५-१९ असे, तर नंतर मध्य रेल्वेला ४०-२१ असे पराभूत केले.

महिंद्राच्या खेळाडूंनी दक्षिण मध्य रेल्वेच्या चढाईपटूची केलेली पकड.

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया, महाराष्ट्र पोलीस, भारत पेट्रोलियम, मिहद्रा यांनी पुरुषांमध्ये, तर एसएसव्हीके, कबड्डी स्टार, महाराष्ट्र पोलीस, शिवशक्ती यांनी महिलांमध्ये बाद फेरीत स्थान मिळवले आहे.

बोरिवली येथील जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर चालू असलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या अ-गटात भारत पेट्रोलियमने मुंबई पोलिसांना २७-१७ असे रोखत आरामात बाद फेरी गाठली. काशििलग आडकेच्या चढायांना नीलेश शिंदे, नितीन मोरे यांची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळे हे शक्य झाले. विशाल तळेकर, रणजित मस्के यांचा खेळ पोलिसांना तारण्यास कमी पडला.

एअर इंडियाने ब-गटात सशस्त्र सीमा दलाचा ४८-२८ असा फडशा पाडला. मिहद्राने क-गटात दक्षिण मध्य रेल्वेला २८-२७ असे चकवत बाद फेरीतील स्थान निश्चित केले. ओमकार जाधव, आनंद पाटील यांच्या जोशपूर्ण चढाया, तर ऋतुराज कोरवी, सचिन शिंगाडे यांच्या भक्कम क्षेत्ररक्षणाला याचे श्रेय द्यावे लागेल. रेल्वेचे मयूर शिवतरकर, राजू, सचिन आमिर यांनी पूर्वार्धात जो जोश दाखवून आघाडी घेतली होती, ती उत्तरार्धात काय टिकली नाही. याच गटात देना बँकेने सेंट्रल बँकेला ३०-२९ असे एका गुणाने पराभूत केले. देना बँकेकडून अक्षय सोनी, अक्षय गोजारे यांनी, तर सेन्ट्रल बँकेकडून सुशांत साईल, रोहित उत्तम खेळले.

ड-गटात महाराष्ट्र पोलीस संघाने  मुंबई बंदराला ३५-१९ असे, तर नंतर मध्य रेल्वेला ४०-२१ असे पराभूत केले. या दोन्ही सामन्यांत सुलतान डांगे, महेश मगदूम, बाजीराव होडगे, विवेक भोईटे यांनी चतुरस्र खेळ केला. महिलांच्या अ-गटात शिवशक्तीने कबड्डी स्टारला ४२-१६ असे नमवले. अपेक्षा टाकळे, पूजा यादव यांचा खेळ या विजयासाठी महत्त्वाचा ठरला. ब-गटात पंजाब पोलिसांनी पोयसर जिमखान्याचा ३५-१५ असा पराभव केला.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Air india maharashtra police in knockout round of all india kabaddi tournament