भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासलं आहे. त्यामुळे दोन टेस्टची ही मालिका भारतीय संघासाठी आव्हानात्मक असणार आहे. काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचा एक फिरकीपटू अजंथा मेंडिस भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला होता. मध्यमगती गोलंदाज वाटणाऱ्या अजंथाला मिस्ट्री स्पिनर अशी बिरुदावली मिळाली.

२०१९ मध्ये अजंथाने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये अजंथाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. कॅरम बॉलचा उद्गाता मेंडिसला खेळणं भारतीय संघाला जवळपास अशक्य झालं होतं. भारतीय संघाविरुद्ध १९ वनडेत त्याने ३६ विकेट्स पटकावल्या. भारताविरुद्धच्या ६ टेस्टमध्ये मेंडिसने ३४ विकेट्स घेतल्या. एकूण विचार केला तर मेंडिसने १९ टेस्टमध्ये ७० तर ८७ वनडेत १५२ आणि ३९ टी२० सामन्यात ६६ विकेट्स पटकावल्या.

मेंडिसने एप्रिल २००८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केलं. पदार्पणाच्या लढतीत मेंडिसने ३ विकेट्स घेतल्या मात्र आशिया चषकात त्याने खळबळ उडवून दिली. ४ सामन्यात ११ विकेट्स घेतल्यानंतर मेंडिसने फायनलमध्ये भारताविरुद्ध त्याने अवघ्या १३ धावांत ६ विकेट्स घेण्याची करामत केली. १९व्या सामन्यात त्याने वनडेत ५० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. आजही हा विक्रम मेंडिसच्या नावावर आहे.

काही दिवसातच मेंडिसने टेस्ट पदार्पण केलं. पदार्पणाच्या लढतीत त्याने ८ विकेट्स घेतल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत मेंडिसने तब्बल २६ विकेट्स घेतल्या. मेंडिसला खेळणं भारतीय गोलंदाजांना दुरापास्त झालं. दोन्ही बाजूंनी चेंडू वळवण्याची कला अवगत असल्याने त्याचे चेंडू ओळखणं फलंदाजांना कठीण होत असे. टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरीचा (८ धावांत ६ विकेट्स) विक्रम मेंडिसच्या नावावर आहे. २००९ आणि २०१२ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत मेंडिसने आपली ताकद दाखवली होती. टी२० प्रकारात दोन सामन्यात सहा विकेट्स पटकावणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

मात्र जसं त्याची गोलंदाजीतल्या रहस्य फलंदाजांना उमगलं तसं मेंडिसची दहशत कमी झाली. फलंदाजांना त्याच्याविरुद्ध वाटणारी भीती कमी झाली आणि वेगाने धावू होऊ लागल्या. दुखापतींमुळे यात भर पडली. हळूहळू मेंडिसचं नाव निवडसमितीच्या रडारवरून गायब झालं.